औरंगाबादचे संदीप सोमवंशी साधणार भौतिकशास्त्रातील नोबेल विजेत्यांशी संवाद

अतुल पाटील
Tuesday, 18 June 2019
  • 30 जून ते पाच जुलै दरम्यान ही परिषद होत आहे. 
  • 88 देशांतून 580 युवा वैज्ञानिकांना बोलावले आहे.
  • 15 भारतीयांमध्ये संदीप एकमेव महाराष्ट्रीयन आहेत. 

औरंगाबाद : जर्मनीतील लिंडाऊ येथे होणाऱ्या 69 व्या नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या परिषदेसाठी संशोधक विद्यार्थी संदीप बालाजी सोमवंशी यांना निमंत्रित केले आहे. 30 जून ते पाच जुलै दरम्यान ही परिषद होत आहे. 88 देशांतून 580 युवा वैज्ञानिकांना बोलावले आहे. 15 भारतीयांमध्ये संदीप एकमेव महाराष्ट्रीयन आहेत. 

संदीप सोमवंशी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी आहेत. 1951 पासून होणारी नोबेल पारितोषिक विजेत्यांची ही बैठक अत्यंत प्रतिष्ठेची असते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व वैद्यकशास्त्रातील अनेक नोबेल पारितोषिक विजेते जगभरातील युवा वैज्ञानिकांसोबत चर्चा केली जाते. युवावैज्ञानिकांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी व त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज वैज्ञानिकांची व्याख्याने, वैयक्तिक चर्चा, मास्टर क्‍लासेस आणि पॅनेल चर्चा या माध्यमांतर्गत थेट संवाद साधतात. यावर्षीची बैठक भौतिकशास्त्राला समर्पित केली आहे. 

प्रा. डॉ. डोना स्टिकलॅंड, प्रा. डॉ. जॉर्ज मॉरो या गतवर्षीच्या नोबेल पारितोषिक विजेत्यासहीत तब्बल 41 नोबेल पारितोषिक विजेते सहभागी होणार आहेत. बैठकीनंतर जर्मनीमधील विविध संशोधन संस्था व विद्यापीठातील प्रगत व आधुनिक उपकरणांवर प्रात्यक्षिके, तांत्रिक माहितीचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे.

अभ्यास भेटी देण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व जर्मन रिसर्च फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या डीएसटी- डीएफजी पुरस्कारानेदेखील संदीप यांना सन्मानित करण्यात आले आहे. परिषदेसाठी त्यांनी पाठविलेल्या शोधनिबंधाचा समावेश उत्कृष्ठ अशा डिजीटल भित्तीपत्रकांमध्ये केला गेला आहे. परिषदेच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या "समर सायन्स फेस्टिवल'साठी फेडरल मिनिस्ट्री ऑफ एज्यूकेशन ऍण्ड रिसर्चतर्फे खास आमंत्रण मिळालेल्या निवडक 35 युवा वैज्ञानिकांमध्ये देखील त्यांचा समावेश आहे. 

असा सुरुय संदीप यांचा प्रवास... 
संदीप यांचे शालेय शिक्षण संस्कार विद्यालय येथून तर, देवगिरी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातून त्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. सध्या ते वरिष्ठ प्राध्यापक डॉ. के. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली "अतिसूक्ष्म चुंबकीय पदार्थांची निर्मिती, त्यांच्या विविध गुणधर्मांची तपासणी व त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्करोगासारख्या आजारावर वेदनाविरहित व अचूक रोग निवारण करणाऱ्या विविध अनुप्रयोग' यावर संशोधन करत आहे. या संशोधनासाठी त्यांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रतिष्ठित अशी डीएसटी-इन्स्पायरशिप प्रदान झाली आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News