कॉंग्रेसची गळती थांबणार कधी? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • पृथ्वीराज चव्हाणांचे संघटनेकडे दुर्लक्ष; काही पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत 

सातारा: लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये गेला. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसमधील काही जण भाजप, शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे पक्षातील उर्वरित पदाधिकाऱ्यांना पक्षाचे काय होणार, असा प्रश्‍न सतावू लागला आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी जिल्ह्यातील पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष केल्याने उर्वरित पदाधिकाऱ्यात प्रचंड अस्वस्थता असून, काहींनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस समितीला लागलेली गळती थांबविण्यात यश आले; पण पक्षाला लागलेली गळती थांबणार कधी, असा प्रश्‍न कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत.
 
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले. एकूणच लोकसभा निवडणुकीपासून कॉंग्रेसला लागलेली गळती थांबेना झाली आहे. अशीच काहीशी अवस्था सातारा जिल्हा कॉंग्रेसची झाली आहे. 

ऐन लोकसभा निवडणुकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे भाजपमध्ये गेले व माढाचे खासदार झाले. त्यांनी जाता-जाता पाच ते सहा तालुक्‍यांची कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यापूर्वी वाईचे माजी आमदार मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील काही जण आमदारकी व मंत्रिपदाच्या लालसेपोटी भाजप, शिवसेनेत जाण्याची तयारी करत आहेत. जिल्ह्यात कॉंग्रेसचे दोन आमदार आहेत. यापैकी माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे हे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या तोंडून भाजपच्या नेत्यांचे कोडकौतुकच ऐकायला मिळत आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत "वेट ऍण्ड वॉच'चीच भूमिक आहे, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. 

पुसेसावळीतील कॉंग्रेसचे नेते धैर्यशील कदम हे यावेळेस कऱ्हाड उत्तरमधून इच्छुक आहेत. आघाडी धर्मामुळे त्यांना कॉंग्रेसमधून या मतदारसंघातून लढता येणार नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याची तयारी केली आहे. अशी एक- एक करीत कॉंग्रेसमधील प्रमुख मंडळी भाजप व शिवसेनेत जाऊन पद, प्रतिष्ठा आणि मंत्रिपद मिळविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत कॉंग्रेसला लागलेल्या गळतीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता जास्त आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर जिल्ह्यात कॉंग्रेसला जिवंत ठेवण्याचे काम माजी अध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील यांनी केले. काही का असेना कॉंग्रेस भवनात महिन्याला एक दोन बैठका, मेळावे, सभा होत होत्या. यानिमित्ताने कॉंग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते संपर्कात होते. मात्र, रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे कॉंग्रेस सोडून गेले आणि कॉंग्रेसची अवस्था अधिक वाईट झाली. आता सहा ठिकाणीचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची ही अवस्था सर्वच पदाधिकाऱ्यांना अस्वस्थ करत आहे. अशावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काहीतरी निर्णय घेतील, अशी अपेक्षा सर्वांना होती; पण त्यांनी पक्ष संघटनेबाबत मौन बाळगले आहे. पदाधिकाऱ्यांनी याबाबत विचारणा केल्यास ते केवळ ऐकून घेतात. मात्र, पुढे कोणताही निर्णय होत नाही. अशा वेळी कॉंग्रेसमध्ये उरलेल्या पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरत आहे.

कॉंग्रेसमध्ये पद घेण्यास सगळी तयार आहेत; पण काम करण्यास कोणीही तयार नाही, असे म्हणणे पृथ्वीराज चव्हाणांचे आहे. त्यामुळे त्यांनीही पक्ष, संघटनेकडे थोडे दुर्लक्ष केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसची जिल्ह्यातील घडी बसविणे गरजेचे आहे. अन्यथा कॉंग्रेसची प्रमुख नेते मंडळी भाजप, शिवसेनेत सामील होतील. भाजपने लोकसभा निवडणुकीपासून कॉंग्रेस मुक्त भारतची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांना कॉंग्रेसमधील नाराजांची मदत होत आहे. त्यामुळे साताऱ्यातही तशी परिस्थित होऊ नये, यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी पक्ष संघटनेत लक्ष घालून पक्षाची घडी बसविणे गरजेचे आहे. 

पक्षाची गळतीही रोखावी! 
जिल्हा कॉंग्रेसच्या साताऱ्यातील भवनाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली होती. मध्यंतरी आमदार आनंदराव पाटील यांनी ही गळती काढून कॉंग्रेस भवनाची डागडुजी केली; पण त्यानंतर पक्षातील नेत्यांची गळती सुरू झाली. त्यामुळे कॉंग्रेस भवनाची गळती रोखली, तशी आगामी काळात पक्षाची गळतीही रोखावी लागले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News