काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणते,'आमचं ठरलं' !

सकाळ (यिनबझ)
Saturday, 7 September 2019
  • पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार 
  • पक्षात राहिलेलेल्या आमदारांनी पुन्हा संधी देण्याचा निर्णय 

पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादीची सध्या विधानसभा जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात काँग्रेसमसोबत चर्चा करताना राष्ट्रवादीच्या जागांविषयी अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे.

यात बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवरही चर्चा झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. पक्षात राहिलेलेल्या सर्व विद्यमान आमदारांनी पुन्हा संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.

राष्ट्रवादीचे हे उमेदवार निश्चित
अजित पवार (बारामती, पुणे), दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव, पुणे), शशिकांत शिंदे (कोरेगाव, सातारा), छगन भुजबळ (येवला, नाशिक), जितेंद्र आव्हाड (कळवा-मुंब्रा, ठाणे), जयंत पाटील (इस्लामपूर, सांगली), नवाब मलिक (अणूशक्ती नगर, मुंबई) या सात नेत्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात आले आहे.

काँग्रेसमध्ये काय चाललंय?
काँग्रेसने महाराष्ट्रातील निवडणुकीची जबाबदारी माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे दिली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत ५७ उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. यात विद्यामान सभागृहातील ३० आमदारांचा समावेश आहे.

यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधिमंडळाचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्यकारिणीतील विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती आहे. येत्या १० सप्टेंबरला दुसरी यादी काँग्रेसकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुंबईत काँग्रेसचे काय?
मुंबई काँग्रेसमध्ये असलेले मतभेद पुन्हा उफाळून आले आहेत. मिलिंद देवरा आणि संजय निरुपम या दोन मुंबई काँग्रेसच्या माजी अध्यक्षांमध्ये अजूनही मतभेद आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवरा यांनी मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पण, त्यानंतर हे पद रिक्तच आहे. सध्या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रे देण्यात आली आहेत.

मुंबईत कोण किती जागा लढणार?
मुंबई शहरात विधानसभेच्या ३६ जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत ताकद कमी असल्याने जागा वाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ ७ जागा देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी २९-९ असा फॉर्म्युला राबवणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News