गांधी कुटुंबाबाहेरचे काँग्रेस अध्यक्ष, पाहा कॉंग्रेस अध्यक्षांचा संपूर्ण इतिहास 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याने तब्बल दोन दशकांनंतर गांधी कुटुंबाबाहेरची व्यक्ती काँग्रेसचे नेतृत्व करेल.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याने तब्बल दोन दशकांनंतर गांधी कुटुंबाबाहेरची व्यक्ती काँग्रेसचे नेतृत्व करेल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा कालखंड विचारात घेतला, तर आतापर्यंत काँग्रेसचे अठरा अध्यक्ष झाले, त्यातील पाच जण हे गांधी कुटुंबातीलच होते, तर अन्य तेरा जणांचा गांधी कुटुंबाशी कसलाही संबंध नव्हता. विशेष म्हणजे गांधी कुटुंबातील व्यक्ती पक्षाची अध्यक्ष असतानाच तिच्या हाती सर्वाधिक काळ पक्षाची सूत्रे राहिली आहेत, हे विशेष.

 

१९४७ : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे. बी. कृपलानी काँग्रेसचे अध्यक्ष बनले, मेरठ येथे झालेल्या अधिवेशनात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कृपलानी हे महात्मा गांधी यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जात.

 

१९४८ ते ४९ : या काळात पक्षाचे नेतृत्व पट्टाभी सीतारामय्या यांच्याकडे होते. जयपूरमधील अधिवेशनाचे नेतृत्व त्यांनी केले होते.

 

 

१९५० : पुरुषोत्तमदास टंडन काँग्रेसचे अध्यक्ष बनले. नाशिकमधील अधिवेशनाचे नेतृत्व त्यांनी केले. हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली होती.

 

१९५५ ते १९५९ : या काळात यू. एन. ढेबर हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. अमृतसर, इंदूर, गुवाहाटी आणि नागपूरमधील काँग्रेसची अधिवेशने त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली. १९५९ ला इंदिरा गांधी अध्यक्ष बनल्या.

 

१९६० ते ६३ : या काळात नीलम संजीव रेड्डी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद होते. बंगळूर, भावनगर आणि पाटण्यातील पक्षाची अधिवेशने त्यांच्याच नेतृत्वावाखाली झाली. पुढे रेड्डी हेच देशाचे सहावे राष्ट्रपती बनले.

 

१९६४ ते ६७ : भारतीय राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे के. कामराज काँग्रेसचे अध्यक्ष बनले, भुवनेश्‍वर, दुर्गापूर आणि जयपूर येथील अधिवेशनांचे नेतृत्व त्यांनी केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री यांना पंतप्रधान करण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जाते.

 

१९७० ते ७१ : बाबू जगजीवनराम यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली. याआधी १९४६ मध्ये बनलेल्या नेहरूंच्या काळजीवाहू सरकारमध्ये ते सर्वांत तरुण मंत्री होते.

 

१९७२ ते ७४ : शंकर दयाळ शर्मा पक्षाचे अध्यक्ष बनले. नीलम संजीव रेड्डी यांच्यानंतर शर्मा यांना राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली होती.
१९७५ ते ७७ : देवकांत बरुआ काँग्रेसचे अध्यक्ष बनले, या काळात देशभर आणीबाणी लागू होती, बरुआ यांनीच या काळात ‘इंदिरा ईज इंडिया आणि इंडिया ईज इंदिरा’ ही घोषणा दिली होती.

 

१९७७ ते ७८ : या काळात ब्रह्मानंद रेड्डी काँग्रेसचे अध्यक्ष बनले. यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली. इंदिरा गांधी या काँग्रेस (आय)च्या अध्यक्ष बनल्या. त्यापुढे १९८४ मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत त्या पदावर कायम होत्या. यानंतर १९८५ ते १९९१ या कालावधीत राजीव गांधी पक्षाचे अध्यक्ष बनले.

 

१९९२ ते ९६  : राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पी. व्ही. नरसिंह राव काँग्रेसचे अध्यक्ष बनले. राव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशात उदारीकरणाचे वारे वाहू लागले.

 

१९९६ ते ९८  : या काळात सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष होते. यानंतर १९९८ ते २०१७ या प्रदीर्घकाळात सोनिया गांधी याच पक्षाच्या अध्यक्ष होत्या, त्यानंतर ही धुरा राहुल यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News