विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आता न्यायालयात?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • सिंघवी ‘व्यक्तिगत’ दाद मागणार; संख्याबळाच्या निकषाला विरोध
  • ५२ जागा मिळवून काँग्रेस हा सर्वांत मोठा विरोधी पक्ष असला तरी विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्‍यता नाही.​

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकी-मधील दणदणीत पराभवानंतर काँग्रेस पक्ष लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी न्यायालयाचा आधार घेण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आणि विधिज्ञ अभिषेक सिंघवी हे पक्षातर्फे नव्हे, तर ‘व्यक्तिगत’  पातळीवर न्यायालयात या मुद्द्यावर दाद मागणार आहेत. किमान संख्याबळाच्या निकषाला कोणतीही कायदेशीर वैधता नसून केवळ परंपरांच्या हवाल्याने प्रशासकीय आदेशानुसार यावर निर्णय केला जात असल्याचे सिंघवी यांचे म्हणणे आहे. 

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून सरकारकडे मागणी केली जाणार नाही, असे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी अलीकडेच जाहीर केले होते. मात्र, दुसरे प्रवक्ते आणि ज्येष्ठ वकील असलेले अभिषेक सिंघवी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी न्यायालयात धाव घेणार आहेत. अर्थात, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा सभागृहातील कारवाई मानून न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यास अडचण होऊ शकते. या कारणास्तव काँग्रेस उघडपणे न्यायालयात जाण्यास तयार नाही, असे सांगितले जाते. 

या मुद्द्यावर सिंघवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान संख्याबळाचा निकष स्पष्ट करणारा कोणताही कायदा नसून हा प्रकार केवळ संसदीय परंपरेतून चालत आला आहे. पिठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या दाखल्याच्या आधारे प्रशासकीय आदेशानुसार याची अंमलबजावणी सुरू आहे. प्रत्यक्षात खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांशी निगडित कायद्यामध्ये विरोधी पक्षनेता हा सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाचा असेल, असेच म्हटले आहे. काँग्रेस पक्षातर्फे नव्हे, तर व्यक्तिगत पातळीवर न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

काय आहेत निकष?
लोकसभेतील एकूण ५४३ सदस्य संख्येच्या किमान दहा टक्के संख्याबळ म्हणजेच ५४ खासदार असणाऱ्या विरोधी पक्षाला केंद्रीय मंत्र्यांचा दर्जा असलेले विरोधी पक्षनेतेपद मिळते. गेल्या लोकसभेत अवघ्या ४४ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला सर्वांत मोठा विरोधी पक्ष ठरूनही या निकषामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळाले नव्हते. आताही ५२ जागा मिळवून काँग्रेस हा सर्वांत मोठा विरोधी पक्ष असला तरी विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्‍यता नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News