नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची सत्त्वपरीक्षा !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • भाजपला अडचण शिवसेनेची;
  • काटोल, रामटेकमध्ये पेच कायम 

नागपूर : नागपूर (ग्रामीण) जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांत अनुत्साह आहे. त्यामुळे युतीत भाजपची वाटचाल तुलनेने सोपी आहे. तरीही शिवसेना काही जागा तरी मागणार, हे निश्‍चित !

त्याला तोंड कसे द्यायचे आणि वाद न होता शिवसेनेला साथीला कसे ठेवता येईल, याचे उत्तर शोधण्याचीच अडचण भाजपसमोर आहे. पण कोंडी आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची. सत्ता जाताच काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहात झाली आहे. दोन्ही काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या कुंपणावर आहेत.

नागपूर (ग्रामीण) जिल्ह्यात मागील निवडणुकीत सावनेरची जागा थोडक्‍यात गमवाल्याचे शल्य भाजपला अद्यापही बोचत आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्व जागा जिंकून जिल्ह्याला काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प भाजपने केलाय. मात्र, युती झाल्यास शिवसेना जुन्या दोन जागांवर दावा करणार, हे निश्‍चित मानले जाते. यामुळे भाजपसमोरही पेच निर्माण झाला आहे. अनेक वर्षे शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघात आता भाजपचे आमदार आहेत. ‘सिटिंग-गेटिंग’चा नेहमीचा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेसाठी मतदासंघ सुटत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण नाही.

एकंदर परिस्थिती पाहता जिल्हा सर करणे भाजपला फारसे अवघड जाणार नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे हातची सत्ता जाताच काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहात झाली आहे. दोन्ही काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या कुंपणावर आहेत. 

जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सावनेर मतदारसंघातून सुनील केदार जिल्ह्यातील एकमेव काँग्रेसचे आमदार आहेत. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर त्यांची पकड मजबूत आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना पक्षाने संकेत दिल्याने ते कामाला लागल्याची चर्चा आहे. येथून रणजित देशमुख यांचे पुत्र अमोल देशमुख हेसुद्धा प्रयत्न करीत आहेत. 

युतीमध्ये रामटेक आणि काटोल शिवसेनेकडे होते. मात्र, आता दोन्हीही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. रामटेकचे शिवसेनेचे माजी आमदार ॲड. आशिष जयस्वाल खणिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांची शिवसेनेपेक्षा भाजपच्याच नेत्यांसोबत जास्त जवळीक आहे. त्यामुळे येथे उमेदवारी देताना पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक दोन वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. काटोलमधून आशिष देशमुख यांनी काका, माजी मंत्री अनिल देशमुख यांचा धक्कादायक पराभव केला होता. मात्र, त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. 

हिंगण्यामध्ये आमदार समीर मेघे यांनी चांगला जम बसवला आहे. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. माजी मंत्री रमेश बंग यांच्याशिवाय राष्ट्रवादीकडे सबळ पर्याय नाही. येथील काँग्रेसच्या नेत्यांची तोंडं अद्यापही परस्परांच्या विरुद्ध दिशेला आहेत. उमरेड मतदारसंघ राखीव असून, सुधीर पारवे यांच्याशिवाय भाजपला पर्याय दिसत नाही. काँग्रेसमधून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या बरीच असली, तरी सर्वांना चालेल, असा उमेदवार त्यांच्याकडे नाही. 

बावनकुळेंच्या विरोधात कोण?
जिल्ह्याचे लक्ष कामठी मतदारसंघाकडे विशेषत्वाने राहणार आहे. कारण हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ आहे. तो त्यांनी घट्ट बांधून ठेवला आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करणे अधिक कठीण आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अनेक नेते लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्यात जिंकण्याची शक्ती किती, याबाबत साशंकता आहे.

  २००९ मधील विजयी उमेदवार  २०१४ मधील विजयी उमेदवार      लोकसभेतील आघाडी 
काटोल अनिल देशमुख    राष्ट्रवादी    ६८,१४३ डॉ. आशिष देशमुख    भाजप    ७०,३४४     शिवसेना ९०,३६८.
सावनेर सुनील केदार    काँग्रेस    ८२,४५२ सुनील केदार    काँग्रेस    ८४,६३० शिवसेना ८८,११७
हिंगणा विजय घोरमारे    भाजप    ६५,०३९ समीर मेघे    भाजप    ८४,१३९ शिवसेना १,०५,६०३
उमरेड सुधीर पारवे    भाजप    ८४,४१६ सुधीर पारवे    भाजप    ९२,३९९ शिवसेना ९३,६४८
कामठी चंद्रशेखर बावनकुळे    भाजप    ९५,०८० चंद्रशेखर बावनकुळे    भाजप    १,२६,७५५ शिवसेना १,२३,८९४
रामटेक आशिष जयस्वाल    शिवसेना    ४९,९३७ डी. मल्लिकार्जुन रेड्डी    भाजप    ५९,३४३     शिवसेना ९३,१९

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News