काँग्रेस - भाजपची एकमेकांविरुद्ध चिखलफेक सुरूच !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019
  • ‘भाजप, संघामुळे लढाई लोकांपर्यंत नेता आली’ - राहुल गांधी
  • 'मग तुम्ही ६० वर्षे केले तरी काय?'​ - निर्मला सीतारामन​

अहमदाबाद : काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी आज त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे आभार मानले आहेत, या दोन्ही संघटनांनी त्यांच्या विरोधातील संघर्ष जनतेपर्यंत नेण्याची संधी दिल्याचा दावा त्यांनी केला. 

अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेने दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या आज झालेल्या सुनावणीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर झालेले आरोप अमान्य केले. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

अहमदाबादमध्ये पोचल्यानंतर राहुल यांनी ट्‌विटद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

‘‘ संघ आणि भाजपने माझ्याविरोधात भरलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी मी आलो आहे. मी या संघटनांचे आभार मानायला हवेत; कारण त्यांनीच मला त्यांच्या विरोधातील तात्त्विक संघर्ष लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. सत्यमेव जयते.’’

असे राहुल यांनी म्हटले आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर या बॅंकेने पाच दिवसांत रद्द झालेल्या ७५० कोटी रुपयांच्या नोटा बदलल्या, असा आरोप राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी ट्‌विटरवरून केला होता. 

काँग्रेसने नक्की धोरण ठरवावे

भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी रुपयांपर्यंत वाढणे, ही माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या मते जर स्वाभाविकपणे घडणारी प्रक्रिया असेल, तर काँग्रेसने ६० वर्षे राज्य करून नेमके केले तरी काय, असा प्रतिप्रश्न विचारून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसच्या अर्थसंकल्पी टीकेला राज्यसभेत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. 

चिदंबरम यांनी सोयीची तेवढी आकडेवारी मांडताना प्राप्तिकर संकलनाची एकत्रित गणना व अर्थसंकल्पाच्या रचनेतील मूलभूत गोष्टी दडवून ठेवल्याचाही आक्षेप सीतारामन यांनी नोंदविला. यूपीएच्या काळात अर्थव्यवस्थेच्या विकासापेक्षा गैरव्यवहारांमागून गैरव्यवहार करण्यावरच तुमचे लक्ष केंद्रित झाले होते, त्याला मोदी सरकार काय करणार? तुम्ही आम्हाला काय वारसा ठेवला, तर न भरलेल्या कित्येक कोटींच्या बिलांचा डोंगर, असे सीतारामन यांनी सागंितले.

जीएसटी तुम्हीच आणला हे मान्य; पण तो यशस्वीपणे लागू आमच्या सरकारनेच केला आणि तुमचे नेते आजही त्याला ‘गब्बर सिंग टॅक्‍स’ म्हणून हिणवतात. तेव्हा ‘गब्बर सिंग टॅक्‍स’ला तुमचा पाठिंबा आहे की जीएसटीचे श्रेय तुम्हाला हवे, याचा एकदा काँग्रेसने निर्णय करावा, अशी टीका सीतारामन यांनी केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News