नांदेडमध्ये बॅनर लावून पत्रकार रवीश कुमार यांचे कौतुक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

रवीश हे यामधील एकमेव भारतीय पत्रकार ज्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारितेत वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात असल्याचं रॅमन मॅगसेसे कमिटीच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. रवीश कुमार यांचा कार्यक्रम 'प्राईम टाईम' हा जीवनातील खरे मुद्दे आणि सामन्यांच्या अडचणींवर भाष्य करतो, असं रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाऊंडेशनने सांगितलं. मात्र याच कौतुक देशातील जनतेसोबतच देशातील मीडियाला देखील नसल्याचे दिसून येत आहे. 

नांदेड : पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे एनडीटीव्हीचे मॅनेजिंग एडिटर रवीश कुमार यांना नुकताच रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. पत्रकारितेमधील योगदानासाठी रवीश कुमार यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र रवीश यांच्या या पुरस्काराची भारतीय मीडियाकडून फारशी दखल घेतल्याचे पहायला मिळालं नाही. एका पत्रकाराचा एवढा मोठा सन्मान होत असताना आजची मीडिया केवळ सरकारच्या मागे पुढे करत असल्याचे पहायला मिळत आहे. यामुळेच  नांदेडमधील चौकात पत्रकार रवीश कुमार यांचे कौतुक करणारे बॅनर व्यवसायिक कलावंत नयन बारहाते यांनी लावले आहेत.  

नांदेड  येथील महत्वाच्या दोन चौकात नयन यांनी रवीश यांचे कौतुक करणारे बॅनर लावले आहेत. आज सगळ्या देशातील मीडिया, बहुतांश मीडिया सरकारचे पाय धूत असताना, एकमेव माणसाने सामान्य लोकांचा आवाज बनून सगळ्या मीडियाच्या विरोधात जाऊन काम केलं आहे. तो एकीकडे आणि भारतातील मीडिया एकीकडे अशी परिस्थिती आहे. भारतातीलच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी त्याला शिव्या दिल्या. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, त्याच्या कुटुंबाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर बंदी आणण्यात आली. मात्र असे असताना देखील रवीश यांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली. तरीही भारतातील वृत्तपत्रांनी त्यांचे कौतुक पाच ओळींच्या बातम्यांमध्ये आटोपले. एनडीटीव्ही सोडून इतर चॅनलने तेवढ्या प्रमाणात या बातमीची दखल घेतली नाही. असं असताना आपण त्याच्या मागे उभं राहून कौतुक करणे हे आपलं कर्तव्य होत, ते मी केलं, असं नयन यांनी सांगितले. 

रवीश कुमार यांनी आज इतक्या लोकांचा आवाज त्यांनी बुलंद केला आहे. इतकी मोठी मोठी प्रकरण त्यांनी समोर आणली आहेत. महिला, विद्यार्थी, सामान्य जनता अशा एकूणच सगळ्यांना विचारात घेऊन अनेक एपिसोड केले आहेत. या गोष्टींची भारतीयांनी साधी दखल घेऊ नयेत? अरविंद केजरीवाल यांना  देखील मॅगसेसे मिळाला आहे, त्यांचे काय हाल केले? हे आपण पाहतोच आहे. अशा परिस्थितीमध्ये पत्रकार रवीश कुमार यांना भारतात न्याय मिळण्याची काही शक्यताच नाही. मात्र आज आंतरराष्ट्रीय पातळीवर एका पत्रकाराने आपले नाव नोंदवलं आहे, ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे, मात्र अभिमान कसा व्यक्त करायचा? म्हणून मी हे केल असल्याचं देखील नयन यांनी सांगितलं. 

या गोष्टीसाठी माझं अभिनंदन देखील होत आहे. अनेकांचे फोन, मेसेज येत आहेत. आज बॅनर पाहून तब्ब्ल २० वर्षांनी एक गृहस्थ मला भेटायला आले. त्यांनीही माझं अभिनंदन केले.  रवीश आणि माझा काहीही संबंध नाही मात्र तरीही मला कौतुक म्हणून केलं. हा एशियाचा नोबल पुरस्कार आहे, तो भारतातील एका पत्रकाराला मिळाला. मात्र आपल्या मीडियाने याबाबत काहीच दखल घेतली नाही.

"मी होर्डिंग लावण्याच्या विरोधात आहे. आज होर्डिंगचे स्वरूप आपण पाहिलंत तर कोणत्याही राजकीय पक्षाचे, वाढदिवसाचे फोटो आपल्याला सहज दिसतील. हे दृष्य़िय प्रदूषण आहे, असं मला वाटतं. पण, माझं मत आणि माझा आनंद बहुतांश लोकांपर्यंत पोहचविणे यासाठी हेच माध्यम मला आवश्यक वाटलं. वर्तमानपत्रात जाहिरात दिली तर मला २ लाख रुपये खर्च होईलं, मध्यमवर्गीय म्हणून मला तेवढा खर्च शक्य नाही. त्यामुळे नांदेडच्या दोन महत्वाच्या चौकांमध्ये मी ते होर्डिंग्स लावले."

- नयन बाराहाते, व्यावसायिक कलावंत 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News