मेडिकल, इंजिनिअरिंगच्या प्रवेशाच्या ‘सार’ प्रणालीत गोंधळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, मत्स्यविज्ञान, फाईन आर्टस्‌, आयुष अशा ५२ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

लातूर - वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी शासनाने या वर्षी ‘सेतू अस्टिटंट ॲडमिशन रजिस्टर’ (सार) ही प्रणाली सुरू केली आहे. या प्रक्रियेत सध्या अनेक त्रुटी असल्याने पालक, विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. थोडी जरी चूक झाली तर प्रवेशापासून वंचित रहावे लागते की काय अशी भीती त्यांच्यात आहे. या प्रक्रियेत सुलभता आणण्याची गरज आहे.

५२ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया
वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, मत्स्यविज्ञान, फाईन आर्टस्‌, आयुष अशा ५२ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपर्यंत अभ्यासक्रमनिहाय स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया होती. या वर्षी मात्र शासनाने प्रवेश सुलभतेसाठी ‘सार‘ ही प्रणाली सुरू केली. यावर कशा पद्धतीने प्रवेशाचे अर्ज भरावयाचे आहेत याची माहिती पालक विद्यार्थ्यांना नाही. संबंधित यंत्रणेला देखील नाही. त्यामुळे सध्या पालक, विद्यार्थी वेगवेगळ्या साबयर कॅफेचा आधार घेताना दिसत आहेत.
 

ना माहितीपत्रक ना नोटिफिकेशन
अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकियेचे माहितीपत्रक विद्यार्थ्यांना देणे गरजेचे असते. पण ‘सार‘वर कोणत्याही प्रकारचे माहितीपत्रक दिलेले नाही. सात जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी माहिती आहे. त्याची अंतिम तारीख किती आहे, याचीही माहिती नाही. प्रवेशाच्या नोटिफिकेशनचीही तारीखही यात नाही. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर पुढची प्रक्रिया कधी याचाही उल्लेख नाही. त्यामुळे संभ्रमात भर पडत आहे.अर्जात सातत्याने बदल‘सार’वरून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकच अर्ज दाखल करायचा आहे. त्यावर ‘विलिंगनेस’ दाखवायचे आहेत. पण, या अर्जात सातत्याने बदल केला जात आहे.पहिले चार दिवस तर अर्जात आर्थिकदृष्ट्या मागास हा प्रवर्गच दिला नाही. जात पडताळणी प्रमाणपत्राची सर्व माहिती विचारली गेली नव्हती. ती आता विचारली गेली आहे. सातत्याने अर्जात बदल केला जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडत आहे.

प्रवेशाच्या तोंडावर ‘सार’ ही प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडत आहे. त्यातच प्रवेश अर्जात रोज काही ना काही अपडेट केले जात आहे. असे न करता एकदाच अपडेट करणे गरजेचे आहे. शासनाने नियुक्त केलेल्या सेतू केंद्राच्या प्रशिक्षित संस्थांची संख्या अत्यंत कमी आहे. शासकीय महाविद्यालयात अधिक सेतू केंद्र देणे गरजेचे आहे.
- प्रा. शिवराज मोटेगावकर, लातूर.

नवीन प्रवेश प्रक्रिया असल्याने गोंधळ उडत आहे. माहितीपत्रक नाही. नोटिफिकेशनची तारीख नाही. प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख नाही. या नवीन प्रक्रियेपासून विद्यार्थी, पालक अनभिज्ञ आहेत. दाखल करायच्या कागदपत्रांतही गोंधळ आहे. सेतू केंद्राची संख्या कमी असल्याने ही प्रक्रिया दीड महिना चालेल की काय, अशी भीती आहे. प्रक्रियेत सुलभता हवी.
- सचिन बांगड, प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक, लातूर.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News