ग्राम सडक योजनेची संकल्पना माझीच ! भाजपच्या या बंडखोर नेत्याचा दावा..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019
  • तत्कालीन सहकाऱ्यांनी माझे श्रेय लाटले
  • भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा यांचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली  : राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या दोन्ही प्रकल्पांच्या संकल्पना मीच मांडल्या होत्या, पण तत्कालीन सहकाऱ्यांनी त्याचे श्रेय लाटले होते, असा दावा माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा यांनी केला आहे.

सनदी सेवेतून राजकारणात आलेल्या सिन्हा यांनी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना १९९८ ते २००४ या काळामध्ये वित्त आणि परराष्ट्र व्यवहार खात्याची धुरा सांभाळली होती. तत्पूर्वी चंद्रशेखर हे पंतप्रधान असतानादेखील ते १९९० ते ९१ या काळात अर्थमंत्री होते. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प ही पूर्णपणे माझी कल्पना होती, मी १९७० मध्ये जर्मनीत असताना ती माझ्या डोक्‍यात फुलली असा दावा सिन्हा यांनी त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘रिलेंटलेस’ या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये केला होता. भारतामध्ये जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी म्हटले आहे.

कॉरिडॉरचा समावेश
राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाची सुरवात १९९८ मध्ये झाली होती, महामार्गांची सुधारणा, त्यांचे रुंदीकरण यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. हे करताना महामार्गांचा दर्जा उच्च ठेवला जावा हादेखील या मागचा प्रमुख उद्देश्‍य होता. याच प्रकल्पामध्ये सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पाचाही समावेश होता. श्रीनगर ते कन्याकुमारीला जोडणारा उत्तर दक्षिण कॉरिडॉर आणि पोरबंदर ते सिल्चरला जोडणाऱ्या पूर्व पश्‍चिम कॉरिडॉरच्या उभारणीच्या संकल्पनेचाही यामध्येच समावेश होता.

...वाजपेयींशी चर्चा
सिन्हा यांच्या या आत्मचरित्रामध्ये वाजपेयींसोबतच्या पहिल्या भेटीचाही संदर्भ देण्यात आला असून यामध्ये ग्रामीण भागांत रस्त्यांची उभारणी आणि त्यासाठी वेगळा निधी ठेवण्याचाही उल्लेख करण्यात आला होता. या योजनेला अटलबिहारी वाजपेयी ग्राम सडक योजना हे नाव दिले जावे, अशी सूचना खुद्द सिन्हा यांनीच केली होती. वाजपेयी यांनी या योजनेचा स्वीकार केला, पण त्यांनी या योजनेला त्यांचे नाव देण्यास मात्र नकार दिला होता, असेही सिन्हा यांनी म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News