संक्रातीच्या वाणपासून सुचली संकल्पना; सुरु झाला व्यवसाय

अतुल पाटील
Monday, 5 August 2019
  • संक्रातीला वाण काय द्यावे, हा विषय चर्चेत आल्यानंतर आईकडून कागदी पिशवी तयार करण्याबाबत प्रेरणा मिळाली
  • वर्षभरापूर्वी झालेल्या प्लॅस्टिक बंदीनंतर मैथिली यांनी कागदी पिशवी बनवायला सुरवात केली.

औरंगाबाद : गिफ्ट पेपरने सजवलेला बॉक्‍स घेऊन एखाद्या समारंभात जाणे, ही पद्धत आता मोडीत निघत आहे. बंदीमुळे प्लॅस्टिकच्या पिशवीदेखील उपलब्ध होत नाहीत, हीच गोष्ट हेरत औरंगाबादेतील मैथिली भोकरे ही तरुणी मुलाला सांभाळून छंद अन्‌ पर्यावरण जोपासताना दिसत आहेत. प्लॅस्टिक, कापडी पिशवीच्या तुलनेत थोडीशी महाग वाटणारी कागदी पिशवी; हवी तशी मस्त सजवता येत असल्यानेच हौशी ग्राहकांचाही याकडे ओढा दिसतोय. 
 

वर्षभरापूर्वी झालेल्या प्लॅस्टिक बंदीनंतर मैथिली यांनी कागदी पिशवी बनवायला सुरवात केली. संक्रातीला वाण काय द्यावे, हा विषय चर्चेत आल्यानंतर आईकडून कागदी पिशवी तयार करण्याबाबत प्रेरणा मिळाली. याबाबत पती सुमित यांनी पिशवी कशी बनवावी, याचे प्रात्यक्षिक दाखवले. एक महिन्याचा मुलगा असताना 15 दिवसात 50 कागदी पिशव्या तयार करुन संक्रातीसाठी त्यांनी मावशीला दिल्या. बदल्यात झालेला खर्च मिळाला. पहिली ऑर्डर नातेवाईकांचीच असल्याने स्वत:च्या श्रमाची किंमत त्यात लावली नव्हती. "तुझ्या श्रमाचे पैसे घेतलेस की नाही?'' या मावशीच्या प्रश्‍नावर "पहिलीच ऑर्डर असल्याने राहू दे!'' असा पहिला अनुभव मैथिली यांनी "सकाळ"सोबत शेअर केला. 

आधीच महागात मिळणाऱ्या कागदी पिशवीला पुन्हा आपल्या श्रमाची किंमत लावली तर, एकुण किंमत किती होईल. असा प्रश्‍नही त्यांना पडलेला. त्यानंतरही 100 पिशव्यांची ऑर्डर नातेवाईकांकडूनच मिळाली होती. आता व्यावसायिक दृष्ट्या याकडे पहायचे झाल्यास पेपर कटींग आणि फोल्डिंगसाठी मशीनची गरज असून त्यामुळे किंमती कमी होण्यात मदत होईल. असे मैथिली यांनी सांगितले. मैथिली यांना याव्यतिरिक्‍त गायन, कथ्थक, पेपरच्या वस्तु, विणकाम, भरतकाम, अभिनय, बागकामाचीही आवड आहे. यातून आनंद मिळत असल्याचे सांगितले. 

अशी बनते कागदी पिशवी 
मैथिली यांनी आतापर्यंत कागदी पिशव्या ऐच्छिक पद्धतीने तयार केल्या. तसेच मागणीनुसार हव्या त्या रंगात, हव्या त्या साईजमध्ये बनवल्या. एक वितीपासून ते तब्बल 20 इंचापर्यंत जवळपास दोन ते अडीच किलो वजन झेपेल या क्षमतेच्या पिशव्या तयार केल्या. बाजारात उपलब्ध असणाऱ्या पिशव्या दहा ते पन्नास रुपयांपर्यंत आहेत. कागदी पिशवीसाठी हॅण्डमेड पेपर, रिबीन, मोती, फुले, रिबेटचा वापर करुन तसेच पेपरच्या सुंदर कलाकृती चिटकवता येतात. 

तरीही कापडी बॅगच वापरा 
कागदी पिशवी तयार करुन छंद जोपासता येतो. घरी बसून काहीतरी काम केल्याचा आनंदही मिळतो. लोकांनी प्लॅस्टिक वापरणे बंद केलेच पाहिजे. मी जरी, कागदी पिशव्या तयार करत असले तरी, टिकावदार अशा कापडी पिशवीला प्राधान्य द्यावे. त्याहीनंतर पर्याय हवा असल्यास कागदी पिशवीचा विचार करावा. 
- मयुरी भोकरे 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News