रोडरोमीयोंना आता त्यांची मस्ती पडणार महागात

मंगेश शेवाळकर
Tuesday, 25 June 2019
  • शहरातील शाळा, महाविद्यालयांमधे विद्यार्थीनींची छेड काढण्याचे प्रकार रोखण्यासोबत रोडरोमीयोंवर कारवाई
  • या शिवाय शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालयात तक्रारपेट्या 
  • बसविल्या जाणार आहेत.

हिंगोली -  शहरातील शाळा, महाविद्यालयांमधे विद्यार्थीनींची छेड काढण्याचे प्रकार रोखण्यासोबत रोडरोमीयोंवर कारवाई करण्याठी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या पुढाकारातून सर्वच शाळांमधून तक्रार पेटया बसविल्या जाणार आहे. याद्वारे मिळालेल्या तक्रारींची शहनिशा करून कारवाई केली जाणार आहे. 

शहरामधे सुमारे आठ ते दहा शाळा असून सात पेक्षा अधिक कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आहेत. या शिवाय शहरातील बहूतांश नवीन वसाहतीमधे शिकवणी वर्ग घेतले जात आहेत. शहरासह ग्रामीण  भागातील विद्यार्थीनी दररोज शाळा, महाविद्यालयासोबतच शिकवणी वर्गासाठी येतात. सकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी नऊ  वाजे पर्यंत, तसेच दुपारी साडेबारा ते तीन व त्यानंतर सायंकाळच्या वेळी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. 

दरम्यान, शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थीनींना छेडछाड होण्याचे प्रकार रोखण्यासाठी तक्रार पेट्यांचा पर्याय हाती घेण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड यांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. साध्या वेशातील पथके शाळा, महाविद्यालय सुरु होण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळी परिसरात थांबणार आहे. 

या शिवाय शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालयात तक्रारपेट्या 
बसविल्या जाणार आहेत. विद्यार्थीनींना त्यांच्या तक्रारी या पेटीमधे टाकणे अपेक्षीत आहे. प्रत्येक बीट जमादाराकडून त्यांच्या बीटमधील शाळा, महाविद्यालयातील तक्रारपेट्या दर आठवड्याला उघडून त्यानुसार चौकशी केली जाणार आहे. यामधे तक्रारींची शहनिशा झाल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

शहरात पोलिस विभागातर्फे तक्रारपेट्या बसविल्या जात आहेत. 
यामधे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही केली जाईल. तसेच शहरातील मुख्य ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची दररोज तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे तक्रार नसेल तरी फुटेजवरून संबंधीतांवर कारवाई केली जाणार आहे. 
-अशोक घोरबांड, पोलिस निरीक्षक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News