सुसंवादातून आयुक्तांनी जाणून घेतले शहराचे प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 August 2019
  •  वाहतूक नियोजन,  छेडछाड आणि चोरीवर नियंत्रणाची मागणी 

सोलापूर: पोलिस आयुक्तालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून शहराचे प्रश्‍न जाणून घेतले. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी, रोड रोमियोंवर कारवाई व्हावी, चोरीच्या घटनांवर नियंत्रण यावे यासह शहरातील अनेक प्रश्‍न यावेळी मांडण्यात आली. यावर सकारात्मक मार्ग काढण्याचा शब्द आयुक्त शिंदे यांनी दिला. 

गुरूवारी सायंकाळी हेरिटेज मंगल कार्यालयात सुसंवाद कार्यक्रम आयोजिला होता.यावेळी मंचावर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त विजयकुमार मगर, उपायुक्त बापू बांगर उपस्थित होते. स्वागत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले. 

यावेळी आयुक्त शिंदे यांनी विविध संघटनेचा पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक आणि तरुणांचे म्हणणे ऐकून घेतले. काही किरकोळ घटना वगळता सोलापूर शहर शांत राहिले आहे. चोरीच्या घटना वाढल्या आहेत, यावर नियंत्रण आणावे अशी अपेक्षा माजी नगरसेवक अरुण भालेराव यांनी व्यक्त केली. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरु असलेली काम लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना महापालिकेला करावी असे महमद हुसेन मेजर यांनी सांगितले. 

शहरातील रोड रोमियांचे प्रश्‍न महेश धाराशिवकर यांनी मांडला. पोलिसांच्या ड्युटीची वेळ कमी करावी. जड वाहतूकीच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे हा मुद्दा प्रशांत इंगळे यांनी उपस्थित केला. 

याप्रसंगी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे, माजी आमदार शिवशरण पाटील, माजी महापौर मनोहर सपाटे, प्रताप चव्हाण, के.डी.कांबळे, हिशाम शेख, राजा इंगळे, बिस्मिल्ला शिखलगार, रवींद्र नाशिककर, दिलीप कांबळे, किरण पवार, विजय पुकाळे, विष्णू कारमपूरी, नगरसेविका सुनीता रोटे, फिरदोस पटेल, देवेंद्र भंडारे, मकबूल मोहोळकर, सुमन मुदलियार, युवराज पवार आदी उपस्थित होते. 

पोलीस विभागाकडून जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी हा सुसंवाद आयोजिला आहे. जनतेच्या समन्वयातून शहरासाठी जे काही चांगले आहे ते करण्यात येईल. शहराचे नावलौकिक वाढवण्यासाठी आपण सारेजण प्रयत्न करूया. शहरवासीयांच्या प्रश्नावर लवकरच सुधारणा दिसून येतील. 
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त 

शासकीय रुग्णालयात वाहतूक शाखेकडून कारवाई होते. हे चुकीचे आहे. रुग्णालयात येणारी मंडळी अधीच त्रासलेली असतात. त्यांच्या वाहनांवर कारवाई करून पुन्हा त्रास देणे योग्य नाही. पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी.
 - रुपेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते 

शहरातील सर्वच पाण्याच्या टाकीच्या परिसरात, टाकीच्या खाली सायंकाळनंतर मद्यपी मंडळींचे अड्डे भरतात. सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. अशा मद्यपिंवर पोलिसांकडून कारवाई व्हायला हवी. 
- डॉ. दादाराव रोटे, सामाजिक कार्यकर्ते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News