आयुष्यातील दोन अतरंगी मित्रांची कॉमेडी

विशाखा टिकले-पंडित
Saturday, 15 June 2019
  • चार भागांच्या या सीरिजमध्ये विपुल गोयल 
  • आणि त्याच्या आयुष्यातील दोन अतरंगी मित्रांची कॉमेडी दाखवतानाच नातेसंबंधावरदेखील मार्मिक भाष्य करण्यात आलं आहे.
  • पडद्यामागं घडणारं हे विनोदी नाट्य पाहण्याजोगं आहे

‘ह्यु  मरसली युवर्स’मधून विपुल गोयल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या वेबसीरिजचा हा दुसरा सिजन म्हणजे धमाल आहे. चार भागांच्या या सीरिजमध्ये विपुल गोयल आणि त्याच्या आयुष्यातील दोन अतरंगी मित्रांची कॉमेडी दाखवतानाच नातेसंबंधावर मार्मिक भाष्य करण्यात आलं आहे. 

विपुल गोयल हा स्टॅंडअप कॉमेडियन. आयआयटीमधून ग्रॅज्युएट झालेल्या विपुलने स्टॅंडअप कॉमेडीला करिअर म्हणून स्वीकारलेलं असतं. हळूहळू त्याला प्रसिद्धी मिळायला लागते. सीरिजच्या पहिल्या भागातील कार्यक्रम संपल्यावर बॅकस्टेजला विपुल हा रणजीत वालिया या नावाने काही लोकांशी बोलताना दिसतो. काही वेळातच लक्षात येतं, की विपुल नाव बदलून स्वतःचा मॅनेजर रणजीत वालिया म्हणून लोकांशी बोलत असतो.

एका कलाकाराने पैसे, कॉन्ट्रॅक्‍ट या सगळ्या गोष्टी थेट बोलणं योग्य नाही, हे त्यामागचं कारण असल्याचं तो सांगतो. दररोज विपुल गोयल आणि रणजीत वालिया या दोन दोन भूमिका करून कंटाळलेला विपुल स्वतःसाठी खराखुरा मॅनेजर नियुक्त करायचं मनावर घेतो. त्याच वेळेला पुनीत हांडा हा विपुलचा कॉलेजमधील ज्युनिअर आणि भूषी हा आणखी एक मित्र असे दोघे जण विपुलसोबत कार्यक्रमांच्या तयारीला लागतात. सीरिजच्या शेवटच्या भागात एका आडगावातील कॉलेजमध्ये कार्यक्रम करायला गेलेले विपुल, भूषी आणि पुनीत पाहायला मिळतात. सुरुवातीला कसल्याच सुविधा नाहीत, पैसेही अर्धे दिल्याने नाराज असलेलं हे त्रिकुट कॉलेजच्या जगात कसं रममाण होतं आणि धमाल उडवून देतं, एका कार्यक्रमातून विपुलची लोकप्रियता कशी झपाट्याने वाढते, ते दाखवण्यात आलं आहे. 

या कथानकाला जोड दिलीय ती विपुलच्या वैवाहिक आयुष्याची. आठवडाभर ऑफिसमध्ये काम करून, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पडणारी विपुलची बायको काव्या. विपुलच्या कार्यक्रमांमुळे आठवड्याची सुट्टीसुद्धा एकटीने घालवणारी तरीही त्याबद्दल तक्रार नसलेली काव्या अचानक विपुलशी अबोला धरते. काय असतं या अबोल्यामागचं कारण? विपुलची वाढती लोकप्रियता त्यांच्यातील अंतर वाढवते की कमी करते? याची उत्तर या सीरिजमध्ये पाहायला मिळतात. 

अनेक कारणांच्या आडून आपल्या माणसांना गृहीत धरण्याच्या वृत्तीवर या सीरिजमध्ये बोट ठेवण्यात आलं आहे. मी लोकांना चांगलं देऊ शकतो; कारण माझ्यातलं वाईट सहन करायला तू असतेस, हे विपुलने आपल्या बायकोला उद्देशून केलेलं भाष्य खूप काही सांगून जातं. समाजातील अनेक यशस्वी चेहऱ्यांच्या यशामागे घरच्यांची अदृश्‍य साथ किती महत्त्वाची असते, यावर मार्मिक भाष्य करण्यात आलं आहे. 

विपुल, भूषी  आणि पुनीत या भूमिकांमध्ये अनुक्रमे विपुल गोयल, अभिषेक बॅनर्जी, साहिल वर्मा यांनी धमाल उडवून दिली आहे. चेहऱ्यावरचे शांत भाव ठेवत साहिल वर्माने साकारलेला पुनीत बराच भाव खाऊन जातो. रसिका दुगल हिला तुलनेने कमी वाव असला, तरी तिने आपली भूमिका छान साकारली आहे. एकूणच तीन मित्रांची ही धमाल कॉमेडी आणि हसतखेळत नातेसंबंधावर हलकेच भाष्य करणारी ही सीरिज पाहण्याजोगी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News