चला, नाटक करू या..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • नवोदित कलाकारांचा रंगला कलाविष्कार

कोल्हापूर -  येथील प्रोसेनिअम आर्ट असोसिएशनतर्फे झालेल्या ‘चला, नाटक करू या’ उपक्रमांतर्गत आज विविध कलाविष्कार सादर झाले. ‘व्यासपीठ नवख्या कलाकारांसाठी... रंगमंचावर पहिले पाऊल टाकण्यासाठी...’ हे ब्रीद घेऊन असोसिएशनच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. 

प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील राजशेखर, ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे दिग्दर्शक अनिकेत साने, ‘जुळता जुळता जुळतंय की’ चे दिग्दर्शक अजय कुरणे, अभिनेते राज हंचनाळे, सलीम जमादार यांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. स्वागत व प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष अवधूत जोशी यांनी केले. आजवर ज्यांनी कधी अभिनय केला नाही किंवा ज्यांची इच्छा असतानाही आपापल्या कामामुळे जमले नाही. त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने हा उपक्रम हाती घेतला असून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाशी असोसिएशन संलग्न असल्याचे त्यांनी सांगितले.  

पंचेचाळीस नवोदित कलाकारांनी या उपक्रमाद्वारे रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले. ज्यात आठ वर्षापासून ६१ वर्षांपर्यंतच्या कलाकारांचा या उपक्रमात सहभाग होता. स्त्री भ्रूणहत्या, लहान मुलांचे शोषण, महिला सबलीकरण, महिला सन्मान, नागरी कर्तव्य, भारतीय प्रतिज्ञा, महिला स्वातंत्र्य आदी विषयांवर त्यांनी सादरीकरण केले.

यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश जाधव, खजानिस श्वेता मोकाशी, सत्यजित साळोखे, प्रतिक टाकवडेकर, अमित कुलकर्णी, केतकी जमदग्नी, प्रतीक जाधव, प्रमोद पुजारी, सुमित कदम, शैलेश शिंदे उपस्थित होते. असोसिएशनचे सचिव श्रेयश मोहिते यांनी आभार मानले. गायत्री महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News