महाविद्यालयीन निवडणुकांचं बिगुल वाजलं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 3 August 2019
  • विद्यार्थी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; ९ सप्टेंबरपर्यंत करता येईल अर्ज

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या महाविद्यालयस्तरावरील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. १४ सप्टेंबरला महाविद्यालयांमध्ये सकाळी ११ ते ५ दरम्यान निवडणुका होणार आहेत. त्यासाठी ९ सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येईल. महाविद्यालयात प्रत्येकी पाच प्रतिनिधी निवडून द्यायचे असून, हे सदस्य विद्यापीठस्तरावरील प्रतिनिधींची निवड करण्यासाठी मतदान करतील. 

राज्यातील अकृषी विद्यापीठांना विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीच्या तारखांचे वेळापत्रक ३१ जुलैपूर्वी जाहीर करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. वेळापत्रकानुसार ३१ सप्टेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे सांगण्यात आले होते. त्यानुसार नागपूर विद्यापीठाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार १४ सप्टेंबरला मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर १५ सप्टेंबरपासून विद्यापीठ प्रतिनिधींच्या निवडणुकांना सुरुवात होणार आहे.

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांना चालना मिळावी यासाठी खुल्या निवडणुका घेण्याचा निर्णय यंदापासून घेण्यात आला. त्यानुसार विद्यार्थी संघटनांनी तयारी सुरू केली. विविध विद्यार्थी संघटना खुल्या निवडणुकांसाठी कामाला लागल्या आहेत. तसेच उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू केली. विशेष म्हणजे या निवडणूक प्रक्रियेला महाविद्यालयांमधून हवा तसा  प्रतिसाद मिळत नसला तरी निवडणूक घेणे बंधनकारक असल्याने महाविद्यालयांनीही तयारी सुरू केली.

अशा असतील निवडणुका 
विद्यापीठाच्या आदेशानुसार महाविद्यालयीन स्तरावर प्रत्येक वर्गात एका प्रतिनिधीची निवड करावी लागणार आहे. हे प्रतिनिधी आपल्यापैकी पाच जणांची मतदानातून निवड करतील. यात अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागासप्रवर्गातील प्रतिनिधी आणि एका वर्ग प्रतिनिधीचा समावेश आहे. प्रत्येक महाविद्यालयातून निवडून आलेल्या पाच प्रतिनिधींसाठी मतदान करण्यात येईल. यानंतर एनएसएस, एनसीसी, क्रीडा आणि सांस्कृतिक गटातील प्रतिनिधींची निवड नामनिर्देशातून करावी लागणार आहे. 

विद्यापीठ स्तरावरील निवडणूक प्रक्रिया
पाच प्रतिनिधींचे नामांकन भरणे - १५ ते १८ सप्टेंबर
अर्ज छाननी - १९ सप्टेंबर
अर्ज परत घेणे - २१ सप्टेंबर
प्रतिनिधी निवडणुका - २६ सप्टेंबर
मतमोजणी व निकाल - २९ सप्टेंबर
नामनिर्देशित सदस्यांची घोषणा - २९ सप्टेंबर
विद्यार्थी परिषदेची पहिली बैठक - ३ ऑक्‍टोबर
महाविद्यालयस्तरावरील बैठक - ५ ऑक्‍टोबर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News