महाविद्यालय निवडणूक आचारसंहिता जाहीर

विवेक मेतकर
Friday, 19 July 2019

राज्यातील कॉलेज विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या कॉलेज निवडणुकांचे बिगूल यंदा अखेर वाजले आहेत.

अकोला: राज्यातील कॉलेज विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या कॉलेज निवडणुकांचे बिगूल यंदा अखेर वाजले आहेत. या कॉलेज निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठांना दिल्या असून या कॉलेज निवडणुकांसाठी आचारसंहिता निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे. या आचारसंहितेची अंमलबजावणी व निवडणुकीच्या काळात कोणत्याही उमेदवारांकडून राजकीय हस्तक्षेप आढळून आल्यास थेट उमेदवारी अर्जच रद्द होण्याची शक्यता आहे. 
 

अनेक वर्षांच्या कालावधीनंतर राज्यभरातील कॉलेजांतील बंद झालेल्या विद्यार्थी निवडणुकांना यंदापासून मुहूर्त मिळाला आहे. त्यानुसार गेल्यावर्षी २६ ऑक्टोबर यासंदर्भातील अध्यादेश जाहीर करण्यात आले होते. मात्र, निवडणुका न झाल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली होती. 

शिक्षण विभागाच्या बैठकीत राज्यातील सर्व विद्यापीठांनी ३१ जुलैपूर्वी कॉलेज निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. हे वेळापत्रक जाहीर करताना सप्टेंबरपूर्वी म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी या निवडणुका पूर्ण कराव्यात, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार या कॉलेजांच्या निवडणुकीच्या आचारसंहिता निश्चित करण्यात आल्याची माहिती देखील पुढे आली आहे. 

पक्षाचे बोधचिन्ह नकोच 
या आचारसंहितेनुसार कोणत्याही उमेदवाराला राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थेचे बोधचिन्ह वापरता येणार नाही. त्याचबरोबर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारचे मेळावे किंवा मिरवणूक काढण्यासदेखील मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीमधून राजकारणाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News