मुख्यमंत्र्यांकडून रक्षाबंधनाची भेट, आता महिलांना मोफत बसप्रवास !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019
  • रक्षाबंधनाला निर्णय;
  • भाऊबीजेला अंमलबजावणी

दिल्लीतील बससेवा

  •  एकूण बसगाड्या : ५,५०० 
  •  दिल्ली परिवहन : ३,८०० 
  •  क्‍लस्टर (ऑरेंज) : १,६००

नवी दिल्ली : रक्षाबंधनाची भेट म्हणून महिलांसाठी दिल्ली परिवहन सेवेचा बसप्रवास मोफत करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी केली.

या निर्णयाची अंमलबजावणी भाऊबीजेचे औचित्य साधून २९ ऑक्‍टोबरपासून सुरू होईल. महिलांना मेट्रोतूनही मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.   

केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडियमवर मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील अखेरचे स्वातंत्र्यदिन भाषण केले. ‘आमच्या भगिनींना दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) आणि क्‍लस्टर बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याची घोषणा मी रक्षाबंधनाच्या दिवशी करत आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी भाऊबीजेपासून म्हणजे २९ ऑक्‍टोबरपासून सुरू होईल. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना सुरक्षिततेची हमी मिळेल’, असे केजरीवाल म्हणाले. सार्वजनिक वाहतूक सेवेतील बस आणि दिल्ली मेट्रोमधून महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यची घोषणा केजरीवाल यांनी जूनमध्ये केली होती.

या निर्णयावर टीका करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. दिल्ली सरकार सर्व काही मोफत करत असल्याचे टीकाकार म्हणतात; पण मी उधळपट्टी अथवा लूटमार करत नसल्याचे त्यांनी ध्यानात घ्यावे. लोकांनी करांच्या रूपात दिलेल्या पैशाची पूर्वी चोरी होत असे; आता हा पैसा वाचवून नागरिकांना सोईसुविधा देण्यासाठी वापरला जात आहे, असे ते म्हणाले.

अनेकांनी स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्द्यावरूनही प्रश्‍न उपस्थित केला; परंतु देशात अशी समानता नाही. दिल्लीतील नोकरदारांमध्ये महिलांचा टक्का ११ टक्के इतका अत्यल्प आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महिलांना शिक्षण आणि नोकरीसाठी मोठा प्रवास करावा लागतो. या निर्णयामुळे त्यांना स्वप्न साकार करण्यास मदत होईल, असा विश्‍वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News