दहावी, बारावी व पदवी परीक्षेचा निकाल जाहीर, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी रांगा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019

विद्यार्थी घराजवळच्या महाविद्यालयांपेक्षा नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यास प्राधान्य देत असतात.

जळगाव - दहावी, बारावी व पदवी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांची शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. आवश्‍यक असलेली कागदपत्रे, महाविद्यालयांची निवड करणे, अर्ज घेणे यासाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ सुरू झाली असून, शहरातील मू. जे. महाविद्यालय, नूतन मराठा, बेंडाळे महाविद्यालय, बाहेती महाविद्यालय, धनाजी नाना महाविद्यालयात सकाळी नऊ ते पाच यावेळेत गर्दी होत आहे. 

विद्यार्थी घराजवळच्या महाविद्यालयांपेक्षा नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यास प्राधान्य देत असतात. त्यामुळे अशा नामवंत महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते.  

वातावरणाने भारावले
खुशबू चौधरी : अकरावीच्या प्रवेशासाठी प्रथमच महाविद्यालयात आले. येथील वातावरणाने मी भारावून गेले आहे. खरंच शालेय वातावरण व महाविद्यालयीन वातावरणात खूप फरक असतो. या प्रवेश प्रक्रियेपासूनच भविष्यातील स्वप्न जोमात अभ्यास करून साकार करण्याचा निश्‍चय केला आहे. 

गर्दीमुळे प्रक्रियेस बाधा
हार्दिका डाकलिया : मी सकाळी दहापासून रांगेत उभी आहे; परंतु माझ्या आधीच अर्ज विक्री केंद्रावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली असल्याने ताटकळत उभे राहावे लागले. प्रवेश प्रक्रियेमुळे मला बहुतेक प्रमाणात व्यावहारिक ज्ञान मिळत आहे. 

प्रक्रिया सुरळीत करावी
जयेश बेहरे : मी माझ्या प्रवेश प्रक्रियेसाठी तासाभरापासून रांगेत उभा आहे. महाविद्यालयांनी याबाबत दखल घेऊन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया कशी सुरळीत होईल, यासंदर्भात उपाययोजना करायला हवी. जेणेकरून विद्यार्थ्यांचा त्रास कमी होईल.

योग्य नियोजन हवे
सागर बबरुळे : शहरात प्रवेश घेण्याकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जास्त ओढा असतो. त्यानुसार शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गर्दी वाढली असून, प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी योग्य नियोजन करावे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News