अभाविप आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019
  • आदित्य ठाकरेंसमोर गोंधळ
  • मुंबई विद्यापीठ उपकेंद्र कार्यक्रमातील प्रकार 

कल्याण : येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्‌घाटन कार्यक्रमात कुलगुरू सुहास पेडणेकर यांचे भाषण सुरू होताच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याने गोंधळ घालत घोषणा दिल्या. घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत चोप दिल्याने वातावरण तापले होते.

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रात स्कूल ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड ॲप्लाईड सायन्स विभागाचा उद्‌घाटन सोहळा गुरुवारी होणार म्हणून येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबई विद्यापीठाच्या कुठल्याही पदावर नाहीत. तसेच ते लोकप्रतिनिधीही नाहीत; तरीही विद्यापीठाने त्यांना बोलाविले म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्यास विरोध केला होता.

कार्यक्रमात त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अभाविपचे कोकण प्रदेश मंत्री दर्शन बाबरे यांच्यासमवेत अनेक कार्यकर्ते चौकात जमा झाले होते; मात्र आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यास काही वेळ होत नाही तोच, उपकेंद्र उभारणीसाठी पाठपुरावा करणाऱ्या मनसेच्या माजी आमदार प्रकाश भोईर यांना निमंत्रण न दिल्याच्या निषेधार्थ मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी फलकबाजी करत आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी अभाविपच्या १२ कार्यकर्त्यांसह सात मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

ही घटना ताजी असताना उपकेंद्राच्या सभागृहात आदित्य ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर हे भाषण करण्यास उभे राहताच, अभाविपच्या एका कार्यकर्त्याने घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर हा गोंधळ झाल्याने काही शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर अभाविप कार्यकर्त्याला पकडून चोप देत सभागृहाबाहेर काढले.

‘पोलिस पाहून घेतील, मागे फिरा’!
कार्यक्रमातील गोंधळ पाहून आदित्य ठाकरे यांनी उभे राहून, ‘पोलिस पाहून घेतील. युवा सेना आणि शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मागे फिरा,’ असे आवाहन केले; मात्र काही कार्यकर्त्यांनी त्यांचे न ऐकता आंदोलनकर्त्याला चांगलाच चोप दिल्यामुळे वातावरण तापले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News