मुंबईत आयटीआय प्रवेशासाठी चुरस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019
  • एक लाख १३ हजार अर्ज; संख्या वाढण्याची शक्‍यता 
     

मुंबई - राज्यातील सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी यंदा चुरस निर्माण होणार आहे. अर्ज भरण्यास आणखी आठवडा शिल्लक असताना आतापर्यंत एक लाख १३ हजार ६७४ विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर शुल्क भरून प्रवेश अर्ज निश्‍चित केला आहे. आठवडाभरात अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

रोजगाराच्या संधी मिळवून देणाऱ्या आयटीआय अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळू लागली आहे. ३ जूनपासून आयटीआय प्रवेश अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. राज्यभरात आयटीआयसाठी एक लाख ३७ हजार ३०० जागा आहेत. २० दिवसांत दोन लाख ४८ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील एक लाख १३ हजार ६७४ विद्यार्थ्यांनी कागदपत्रे पडताळणीनंतर प्रवेश अर्ज निश्‍चित केला आहे. तसेच, ७८ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी पसंतीच्या अभ्यासक्रमाचा पर्याय निवडला आहे. यंदा दिल्लीतील डायरेक्‍टर जनरल ऑफ ट्रेनिंगमार्फत ठरवलेल्या नियमानुसार आयटीआयचा अभ्यासक्रम व जागा निश्‍चित केल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजार १९२ जागा कमी झाल्या आहेत. 

गतवर्षी आयटीआयच्या एक लाख ३९ हजार ४९२ जागा होत्या. यापैकी एक लाख २२ हजार ५१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले होते. त्या तुलनेत यावर्षी एक लाख १३ हजार ६७४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याने चांगल्या महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ दिसणार आहे.

 दृष्टिक्षेपात

  •  आयटीआय ः ९५५
  •  सरकारी ः ४१७
  •  खासगी ः ५३८ 
  •  अभ्यासक्रम ः ७९ 
  •  दहावी अनुत्तीर्ण ः ११
  •  दहावी उत्तीर्ण ः ६८

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News