आवड आणि संधी यांची सांगड घालून करिअर निवडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • विद्यार्थ्यांना मिळाली 'यशाची गुरुकिल्ली'; सकाळ आणि संजय घोडावत विद्यापीठातर्फे मार्गदर्शन

लातूर - सचिन तेंडुलकर इंजिनिअर झाला असता किंवा लता मंगेशकर डॉक्टर झाल्या असत्या तर...? एक चांगला खेळाडू किंवा चांगली गायिका भारताला मिळाली नसती. त्यामुळे आवड आणि संधी यांची सांगड घालून तुम्हीही तुमचे करिअर निवडा; पण त्यात यश मिळवायचे असेल तर धडपड, कष्ट याला पर्याय नाही, असा सल्ला विद्यार्थ्यांना करिअर तज्ञांनी दिला.

सकाळ आणि संजय घोडावत विद्यापीठ (कोल्हापूर) यांच्या वतीने 'यशाची गुरुकिल्ली: उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने' या विषयावर आयोजित कार्यशाळेत डॉ. अमेय काटदरे, प्रा. अर्जुन पाटील, प्रा. श्रीशैल सलगरे यांनी शनिवारी मार्गदर्शन केले. या वेळी शेकडो पालक-विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी उत्सुकतेने विविध प्रश्न विचारत शंकाचे निरसनही करून घेतले.

डॉ. काटदरे म्हणाले, वेगवेगळे शिक्षण घेऊन त्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करू शकतो. आजवर सी. एन. आर. राव, विजय भटकर, सचिन बन्सल अशी कितीतरी नावे आपल्याला सांगता येतील, ज्यांनी देशाला पुढे नेले. तसे आपणही व्हावे, असे अनेकांना वाटते. पैसा, प्रसिद्धी मिळावी, असेही वाटते; पण त्यासाठी धडपड महत्वाची आहे. रोबोटिक्स, सोलर एनर्जी, एरोनँटिकल इंजिनिअरिंग, इंडियन आर्मी, कृषी असे अनेक पर्याय समोर आहेत. फक्त आपल्यात कुठली कला आहे, हे ओळखून करिअर निवडायला हवे. मात्र, कष्टशिवाय पर्याय नाही हेही लक्षात ठेवायला हवे.

प्रा. पाटील म्हणाले, शैक्षणिकदृष्ट्या 16 आणि 18 हे वय फार महत्वाचे आहे. या वयात घेतलेल्या निर्णयावरून करिअरची पुढची दिशा ठरत असते. त्यामुळे योग्य ते निर्णय घ्या. इंग्रजीचे न्यूनगंड बाळगू नका. मराठी इतकीच इंग्रजी पक्की असावी. त्यासाठी न भिता इंग्रजी बोला, इंग्रजी वाचा. कुठल्याही क्षेत्रात करिअर करताना ही भाषा गरजेची आहे. या भाषेबरोबरच परदेशी भाषा सुद्धा शिका. त्यातही करिअर करता येते. शिक्षण घेऊन चांगल्या मार्गाने पैसा कमविणे वाईट नाही. प्रा. सलगरे यांनी विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी सांगितल्या. 
मिलिंद सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News