अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थ्यांची आवड हाच अंतीम निर्णय हवा 

मुरलीधर कराळे
Tuesday, 4 June 2019

बारावी झाली, की नेमकं करायचं काय, यावर तोडगा कसा काढावा, याविषयी युवा शिक्षण तज्ज्ञ आणि युनाईट इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय मोरे यांच्याशी केलेली खास बातचित.

नगर: बारावी झाली, की नेमकं करायचं काय, याविषयी प्रत्येक घरात कुरबुर होताना दिसते. विद्यार्थी वस्तुनिष्ठ अभ्यासक्रमांना पसंती देतात, तर पालकांचा कल पारंपारिक अभ्यासक्रमांकडे असतो. अशा द्वीधा मनःस्थितीत प्रत्येक कुटुंब सापडलेले आहे. त्यावर मार्ग काढताना मात्र शिक्षणतज्ज्ञांची अडचण होत आहे. विद्यार्थ्यांचा ट्रेंड बदलतो आहे, प्रत्येक व्यवसायात नव्याने होत असलेल्या बदलांची ही नांदी आहे. यावर तोडगा कसा काढावा, याविषयी युवा शिक्षण तज्ज्ञ आणि युनाईट इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय मोरे यांच्याशी केलेली बातचित.

प्रश्न : सर्वसामान्यपणे पालकांची इच्छा कशी असते?
मोरे : मुलाने डॉक्टर, इंजिनिअर व्हावे, ही पालकांची इच्छा मुलांना आवडेलच याची शास्वती नाही. त्यामुळे डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासाठी सहा वर्षे आणि मोठा खर्च करण्यापेक्षा वेगळे व्यवसायाभिमुख शिक्षण घ्यावे, असा विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात वेगळे असते. काहींना पारंपारिक नोकरी करणे आवडते, तर काही आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल टाकून नोकरी करणे पसंत करतात.

व्यवसाय स्थिरस्थावर असलेले युवक आपल्या व्यवसायात रमून जातात, त्यामुळे त्यांना शिक्षणाची चिंता नसते. एकूचण प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्याला कशात आवड आहे, हे पालकांनी आठवी इयत्तेपासूनच पाहिले पाहिजे. दहावीनंतर त्याला त्याची आवड व त्या अभ्यासक्रमाची सांगड घालणे गरजेचे आहे. बारावीनंतर मात्र त्याला संबंधित अभ्यासक्रम निवडायचा असतो, त्याची तयारी आठवीपासूनच केली, तरच तुम्ही योग्य पर्य़ाय निवडू शकता. त्यामुळे पालकांची इच्छा काहीही असली, तरी विद्यार्थ्यांची आवड ओळखता आली पाहिजे. इच्छा नसताना अनावश्यक विषयाकडे विद्यार्थ्यांना ढकलू नये. थ्री एडियट या चित्रपटातून मुलांच्या आवडी- निवडी विषयीचा खूप चांगला संदेश दिला आहे, त्या संदेशाचा अभ्यास करायला हवा. 

प्रश्न : पारंपारिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांना न्यावे का?
मोरे : पारंपारिक अभ्यासक्रम म्हणजे काय, हे आधी जाणून घ्यावे. इंजिनिअर, वकील किंवा डॉक्टर हे पारंपारिक अभ्यासक्रम होऊ शकत नाहीत. कारण त्यात आधुनिकता असते. उलट त्यामध्ये व्यावसायाच्या मोठ्या संधी आहेत. प्रत्येक कुटुंबाने आपली आर्थिक क्षमता व विद्यार्थ्यांचा कल पाहूनच असे अभ्यासक्रम निवडायला हवेत. डॉक्टर होण्यासाठीचा पाच वर्षांत लागणारा खर्च पालकांना पेलवणार आहे का, हे आधी ठरवावे. नंतर दवाखाणा उभारणीचा खर्चही मोठा असतो. याबाबत विचार करूनच संबंधित पाल्याला या क्षेत्रात टाकावे. असे असले, तरी विद्यार्थ्यांची खूपच इच्छा असेल, तर अनेक पर्य़ाय आहेत. बॅंकांकडून कर्ज, मुलाचे कर्तुत्त्व आदींचा पर्याय असू शकतो.

प्रश्न : खासगी इंग्लिश मीडियम व सरकारी शाळा यांतील विद्यार्थ्यांमध्ये काय फरक जाणवतो?
मोरे : हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारी शाळा व खासगी शाळा या दोन्हीतही शिक्षण चांगलेच दिले जाते. सरकारी नियमांनुसार अभ्यासक्रमही चांगला असतो. अशाच स्वरुपाचा व काहीसा फरक असलेला अभ्यासक्रम खासगी शाळा राबवितात. खासगी शाळांमध्ये इतर उपक्रम राबविण्याचे प्रमाण अधिक असते. १२ वी नंतर मात्र दोन्ही शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना समान परीक्षांना तोंड द्यावे लागते. विद्यार्थी कोणत्या शाळेतून आला, हे पाहिले जात नाही. त्यामुळे कोणत्याही शाळेत विद्यार्थी असला, तरी पालकांनी त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागते. त्याची अभ्यासाची शैली चांगली झाली, तरच १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमांमध्ये तो चांगल्या पद्धतीने करिअर घडवू शकतो. मुलांचा आत्मविश्वास सरकारी शाळांच्या तुलनेत इंग्लिश मीडियमच्या स्कुलमधून जास्त असते. त्याचा परिणाम १२ वी नंतर नक्कीच होतो.

प्रश्न: बारावीनंतर नेमका काय करावे?
मोरे : सर्वांत महत्त्वाच विद्यार्थ्यांची आवड पहावे. पारंपारिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शेतीमाल आयात-निर्यात, उत्पादकांचे मार्केटिंग, खाद्य संस्कृती, पर्यटन असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कला क्षेत्रातही करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी कलेच्या माध्यमातूनही इच्छित करिअर करून तितकाच आर्थिक लाभ घेता येतो. एकूणच ज्या अभ्यासक्रमातून अर्थार्जन चांगले होईल, प्रसिद्धीही मिळेल आणि विद्यार्थ्यांची आवडही पुरविली जाईल. असे अभ्यासक्रम निवडणे, केव्हाही उचित होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News