मुलांना जबाबदारीची कधी होणार जाणीव

शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
Tuesday, 11 June 2019

कुठलंही काम हलकं नसतं. घर झाडल्यानंतर घर छान दिसतंच, पण आपल्यालाही छान वाटतं. हे ‘वाटणं’ मुलांपर्यंत पोचवायला हवं.

आपलं मूल ‘जबाबदार व्हावं’ असं सर्वच पालकांना वाटतं असतं. समाजाच्या दृष्टीनं ‘जबाबदार नागरिक’ होण्याचं शिक्षण प्रथम घरातच दिलं जाणं अपेक्षित असतं. पण मुलं अचानक मोठी होत नाहीत, की जबाबदार होत नाही. त्यासाठी सर्वांत सोपी गोष्ट म्हणजे मुलांना घरातली छोटी-मोठी कामं करू देणं, ती करायला उद्युक्त करणं, आवश्‍यक तिथं ती करायला शिकवणं.

कुठलंही काम हलकं नसतं. घर झाडल्यानंतर घर छान दिसतंच, पण आपल्यालाही छान वाटतं. हे ‘वाटणं’ मुलांपर्यंत पोचवायला हवं. त्यांच्यासोबत काम करावं, काम करताना हसत हसत, गाणं गुणगुणतं, त्यातील गमतीजमती, क्वचित फजिती हे सारं मुलांसोबत शेअर करावं. मात्र मुलांना फक्त कामं सांगू नयेत. त्यांना कुठली कामं आवडतात, कुठली आवडत नाहीत, हे समजून घ्यावं. त्यांच्या काही अडचणी, गैरसमज असल्यास तर ते दूर करावेत.

घरातली कामं सगळ्यांची असतात. घरातल्या इतरांचंही मन सांभाळायचं असतं, हे शिकू शकतात. अर्थात, मुलं यांत्रिकपणे अशी काम करत असल्यास ती जबाबदार होत नाहीत. काही वेळा मुलं गंमत, हौस म्हणून अशी कामं करतातही. पण त्यांची सक्ती केली की गाडी बिनसते. ‘म्हणजे काय... एवढं तरी मुलांनी करायलाच हवं.. ती ही घरातच राहतात ना,’ असा पालकांचा पवित्रा असल्यास सोफे साफ होतात. मात्र, मुलं जबाबदारी शिकतातच असं नाही. 

पालकांकडं हे कौशल्य हवं; मुलांना उद्युक्त करण्याचं. ‘एवढं करशील बाळ? ए, हे तू सांभाळायचंस हं, तू आता मोठा झालायस ना,’ अशा भाषेमुळं मुलांमध्ये मोठं झाल्याची सुखद भावना जागी होऊ शकते. ‘जबाबदारी’चं वैशिष्ट्य असं, की ती फार तर दाखवून देता येते. लादता मात्र येत नाही. मुलं जबाबदार व्हायला हवी असल्यास जबाबदारीची जाणीव त्यांच्या मनात निर्माण व्हायला हवी. त्यासाठी पालकांनी त्यांच्यावर विश्‍वासही दाखवायला हवा. स्वतःची खोली व्यवस्थित ठेवणं, गृहपाठ करणं हेही मुलांनी करायलाच हवं.

पण जबाबदारी फक्त नेमून दिलेलं काम करणं एवढी ‘ढोबळ’ नसते. स्वतः काही विचार करणं, पुढाकार घेणं, निर्णय घेणं व तो मनापासून पाळणं, इतरांसाठी काही करणं हे सारं ‘जबाबदारी’त मोडतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये काही उपजत जबाबदारीची जाणीव नसते किंवा विशिष्ट वयात ती काही आपोआप जबाबदार होत नाहीत. ‘मोठी झाली की कळेल त्यांचं त्यांना...’ अशी भूमिका घेऊन चालत नाही. जबाबदारी शिकवावी लागते. एखादं वाद्य शिकावं तशी मुलं हळूहळू जबाबदारी शिकत जातात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News