मराठी असूनही ‘इंग्रजी’ शाळांतील मुलांची बिघडली ‘मराठी’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019
  • प्राथमिक शिक्षणात हवा मराठीचा विषय; सक्तीचा कायदा करण्याची गरज 

मोहपा - ‘मै स्कूलला जाणार..., मुझे चॉकलेट दे की..’, असे सहज बोलणारी लहान मुले आपल्याला आसपास दिसू लागली आहेत. ‘मुलांची भाषा बिघडली’, अशी कोणीही स्वाभाविक प्रतिक्रिया देऊन मोकळे होईल. परंतु, ही भाषा बिघडली नसून बिघडवली आहे, असे म्हणावे लागेल. याचे कारण सीबीएसई, आयसीएसई, आयबी बोर्डासह अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये चौथीपर्यंत मराठी विषय न शिकविणे हा आहे.घरात मराठी बोलतात, शाळेत इंग्रजी शिकवतात आणि टीव्हीवरचे कार्टून्स हिंदीत, अशा वातावरणातील या मुलांचा मराठीशी संबंधच कमी होऊ लागला आहे.

त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा सक्‍तीचा कायदा करण्याची मागणी साहित्यिक, अभ्यासकांकडून केली जात आहे. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या बारा कोटी आहे. यामध्ये किमान दहा कोटी लोक मराठी बोलतात. गोव्यात मराठीला उपभाषेचा दर्जा आहे. सीमाभागातील पंचवीस लाख लोकांच्या, तर अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विषय मराठी भाषा आहे. ग्वाल्हेर, बडोदा, देवास, तंजावर आदींसह अनेक राज्यांत मराठी माणसांच्या मोठ्या वसाहती असल्याने त्या ठिकाणी मराठीत बोलले जाते.

महाराष्ट्राचे राजकारण मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या अस्मितेवर सुरू असते. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल, हे वास्तव आहे. साहित्य, चित्रपट, कला आदी सर्वच क्षेत्रांत मराठी भाषेची पताका देशभर फडकत आहे. ‘मराठी’ या शब्दाला इतके व्यापक वलय असूनही, मराठी मुलखातच मराठी भाषेचा गळा दाबण्यासारखे काम सुरू आहे. कारण राज्यातील बहुतेक पालकांचा कल हा पाल्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा आहे. मुलाने इंग्रजीत एखादा शब्द बोलला तरी पालकांना गगन ठेंगणे होते; पण आपली मातृभाषा म्हणजेच आईचा दर्जा असणारी मराठी भाषा बिघडत चालली आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News