चिमुकल्यांचे बालपण हरवले पुस्तकामागे; मैदानी खेळ बंद?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019
  • बालपणापासूनच ओढावे लागते अपेक्षांचे ओझे

नांदेड - कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्राचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती. मन हे वेडं होते. कल्पनेच्या दुनियेत जगत होते. मात्र, आताच्या समजुतदारीच्या जगात बालकांना पूर्वीप्रमाणे पहिल्या वर्गापासून शिक्षणाची सुरवात नाही; तर नर्सरीपासून शिक्षण दिल्या जात आहे. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयातच पुस्तके हाती दिली जात असल्याने त्यांचे बालपणच हिरावल्या जात आहे.

अलीकडे सर्वांनाच इंग्रजीचे वेड लागले असल्याने प्रत्येक जणच आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करण्यासाठी धडपडत आहे. परिणामी, आपोआपच विद्यार्थी हा मातृभाषेपासून दुरावत असल्याचे चित्र शहरी तसेच ग्रामीण भागातही पाहायला मिळत आहे. आपल्या पाल्याचे वय वर्षे तीन झाले की, त्याला इंग्रजी शाळेत नर्सरीमध्ये टाकण्याची प्रथा आज रूढ झाली आहे. नर्सरी, केजी वन, केजी टू नंतर तो पहिल्या वर्गात जातो. तोपर्यंत छोटे-मोठे इंग्रजी शब्द, आकडे यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेवर आक्रमण केलेले असते. मराठी पाढे, बाराखडी, मुळाक्षरे आदी प्राथमिक शिक्षणाचे रूपांतर इंग्रजी शाळेतून शिक्षण घेताना दिसत नाही. त्यामुळे मातृभाषेपासून तो खूप दूर गेलेला असतो.

खेळण्याच्या वयातच अभ्यासाचे ओझे 
नर्सरीपासून वर्ग चौथीपर्यंत मोठ्या प्रमाणात पालकांना खर्च करावा लागतो व पालक तो खर्च करतातही. एेन खेळण्याच्या वयात शाळेच्या पायऱ्या चढून रोज होमवर्क, अभ्यासाची पोपटपंची आदी ओझ्याने त्यांच्या शारीरिक व मानसिक तणाव वाढतो, याकडे कुणाचेच लक्ष नाही. ज्या शिक्षणासाठी पालक इतके आग्रही आहेत, त्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या उंची, दृष्टीवर मोठ्या प्रमाणात फरक पडत आहे. लहानपणी मी खूप श्रीमंत होतो. कारण या वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात माझी पण कागदाची दोन तीन जहाजे चालायची, भले चिखलाचा का असेना स्वतःचा किल्ला असायचा. अाता मात्र, हरवली ती श्रीमंती अन् हरवले ते बालपण, असे म्हणण्याची वेळ आल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ प्रकाशराव सोनवणे यांनी व्यक्त केली.

मातृभाषेचे आकलन शून्य 
शाळेत शिकविलेला अभ्यास घरीही घोटून घेतला जातो. त्यात सर्वच शब्द, आकडे हे इंग्रजी भाषेतूनच घेतल्या जातात. त्यामुळे मराठी आपली मातृभाषा आहे, हे सुद्धा तो विसरून जात आहे.

मैदानी खेळ बंद 
मैदानी खेळाअभावी त्याची शारीरिक तंदुरुस्ती संपुष्टात येत आहे. घरी आल्यावर मोबाईल गेम, टीव्ही या शिवाय त्या बालकांकडे कुठलेही मनोरंजनाचे किंवा खेळण्याचे साधन त्यांच्याकडे उपलब्ध नसते. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होणे कठीण आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News