पिकविम्यासाठी चक्क गाव विक्रीला काढले

मंगेश शेवाळकर
Thursday, 18 July 2019
  • मागील वर्षी दुष्काळामुळे शेतीमध्ये उत्पन्न नाही
  • सेनगाव तालुक्यातील आजेगाव मंडळांमध्ये केवळ पस्तीस शेतकऱ्यांनाच पिक विमा दिला
  • त्यामुळे इतर शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा, तसेच सरसकट कर्जमाफीसाठी गावकऱ्यांनी चक्क गावात विक्रीला काढले आहे. या बाबतचा ठरावही बुधवारी (ता. १७) सायंकाळी झालेल्या गावसभेत घेण्यात आला आहे. 

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील गावकऱ्यांची बैठक आज सायंकाळी झाली. यावेळी नामदेव पतंगे, गजानन सावके, माधव सावके, दत्तराव सावके, अमोल सावके, साहेबराव सावके, गणेश सावके, शिवाजी सावके, माधव सावके, गजानन लक्ष्मणराव सावके, संजय सावके, दीपक सावके, किशन सावके रामराव पतंगे यांच्यासह सुमारे चारशे पेक्षा अधिक गावकरी या बैठकीला हजर होते. 

मागील वर्षी दुष्काळामुळे शेतीमध्ये उत्पन्न मिळाले नाही. सेनगाव तालुक्यातील आजेगाव मंडळांमध्ये केवळ पस्तीस शेतकऱ्यांनाच पिक विमा दिला आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सदर पस्तीस शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगला पाऊस झाला का असा सवालही शेतकरी व गावकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे मंडळातील सर्वच गावांमध्ये पिक विमा तातडीने द्यावा, शेतकऱ्यांचे सरसगट कर्ज माफ करावे, गाव विक्री झाल्यानंतर गावकरी व शेतकऱ्यांना रोजगार देण्याची हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये व्यवस्था करावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे.

दरम्यान गाव विक्री काढल्याचे निवेदन गुरुवारी (ता.१८) सर्व गावकरी हिंगोली येथे जिल्हा प्रशासनाला देणार आहेत. या निवेदनानंतर गावातील शाळा व ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवले जाणार आहे. एकही विद्यार्थी शाळेत पाठवणार नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे गावकरी नामदेव पतंगे यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News