सत्ता हातून निसटल्यावर मुख्यमंत्र्यांना झाले अश्रू अनावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019
  • सत्ता गेल्याचे दुःख नाही : कुमारस्वामी
  • अखेरच्या भाषणात झाले भावुक
  • बंडखोरांवर टीका

बंगळूरु : मावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सभागृहात निरोपाचे भाषण करताना भाजपच्या धोरणावर जोरदार हल्ला केला. या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून आपण लोकांना कोणता संदेश देऊ पाहत आहोत, असा सवाल करताना त्यांनी मी योगायोगाने राजकारणात आलो. मी राजकारणात येऊ नये, अशीच माझ्या पत्नीचीही इच्छा होती. सत्ता गेल्याचे दु:ख मला नाही, असेही त्यांनी सांगितले. या भाषणादरम्यान कुमारस्वामी भावुक झाले होते.

सभापतींना उद्देशून ते म्हणाले, ‘‘माझा हेतू तुमच्या पदाचा अवमान करण्याचा नव्हता. मी कर्नाटकच्या ६.५ कोटी लोकांची माफी मागितली आहे. माझ्या पत्नीने, तिच्याशी लग्न केल्यावर राजकारणात सामील होऊ नये, अशी अट घातली होती. राजकारणात तिला रस नव्हता. पण, आज तीसुद्धा या सभागृहात बसली आहे. हा एक योगायोग आहे.

माझे वडील राजकारणात होते. त्यांनी माझा भाऊ एच. डी. रेवण्णा यांना सतत राजकारणात येऊ नकोस, असाच आशीर्वाद दिला.’’ त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर भाजपने पोस्ट केल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, ‘‘आमची संस्कृती आणि युवकांसाठी सोशल मीडिया एक मोठा धोका आहे. मी विश्वास मत जिंकण्यासाठी अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न केला. बहुतेक वेळा आमदारांनी आता काय होईल, यावर चिंता व्यक्त केली. इलेक्‍ट्रॉनिक मीडिया बेजबाबदारपणे वागला. सत्ता गेल्याचे मला दुःख वाटत नाही. मी आनंदाने या पदाचा त्याग करीत आहे.’’

भाजप आणि जेडीएस युती सरकारवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘भाजप आणि जेडीएस यांच्यातील युती करार लक्षात घेता मी आजही सांगेन, की २० महिन्यांनंतर भाजपला मी सत्ता देण्यास तयार होतो. जेव्हा आम्ही त्या सरकारची स्थापना केली तेव्हा कोणत्याही केंद्रीय नेत्यांचा सहभाग नव्हता. पण, सत्ता हस्तगत करताना केंद्रीय नेत्यांनी हस्तक्षेप केला. ते देवेगौडा यांना भेटले आणि त्यांनी एक करार केला.’’

मुख्यमंत्री म्हणून जे काही केले, त्याचे श्रेय माझ्या अधिकाऱ्यांना आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा अहवाल दिला. शेती कर्जाच्या रकमेसाठी आम्ही २५,००० कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत. मी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्याने केला आहे. मी माझ्या शेतकऱ्यांना कधीच फसवत नाही. असंतुष्ट आमदारांवर त्यांनी रोष व्यक्त केला. त्यांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी मंजूर केलेल्या अनुदानाची आकडेवारीच दिली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News