मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही तिप्पट दिले, तुम्हीही द्या !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

सरपंचांच्या मानधनात वाढ केली असून, उपसरपंचांना मानधन सुरू केले आहे. आता ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्ता सुरू केला जाईल. याचबरोबर सरपंच परिषदेला कायदेशीर दर्जा देऊ. 

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

शिर्डी : ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षांत झाले नाही, एवढे काम चार वर्षांत केले. पुन्हा आम्हीच सत्तेत येणार असून, गावांचे उर्वरित प्रश्‍न सोडविणार आहोत. सरपंचांचे मानधन तिपटीने वाढविले आहे. तुम्हाला तिप्पट दिले, आता तुम्ही आम्हाला तिप्पट द्या, असे सूचक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यव्यापी सरपंच व उपसरपंच परिषदेत केले.

या परिषदेत राज्यभरातील चाळीस हजारांहून अधिक सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पंचायतराज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजारप्रमाणे आता राज्यात दोन हजार गावे ‘मॉडेल व्हिलेज’ झाली. हे पाच वर्षांतील फार मोठे यश आहे. या यशाचे शिल्पकार सरपंच आहेत. जिल्हा नियोजन समितीवर सरपंचांना प्रतिनिधित्व देऊ. तसेच, पंधराव्या वित्त आयोगासमवेत सरपंच प्रतिनिधींची चर्चा घडवून आणू.’’

ग्रामविकासमंत्री मुंडे म्हणाल्या, ‘‘जनतेतून सरपंचनिवडीचा निर्णय क्रांतिकारी होता. त्यामुळे होतकरू, सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करणारे सुशिक्षित उमेदवार सरपंच झाले. विकासाला चालना मिळाली.’’ या वेळी सरपंच परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस व ग्रामविकासमंत्री मुंडे यांना मानपत्र देण्यात आले. सरपंचांसाठी सुरू करण्यात आलेल्या ॲपचे उद्‌घाटनही या वेळी झाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News