विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आता पक्षफुटीची शक्यता !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019
  • नेत्यांच्या पळवापळवीला वेग येणार !
  • चंद्रकांतदादा आणखी सक्रिय होणार

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर चंद्रकांत पाटील यांची नियुक्‍ती केल्याने त्यांना राजकीय बळ प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपात आणण्यात माहिर असलेले चंद्रकांतदादा यापुढे सक्रिय होणार असून अन्य पक्षांतील नेत्यांच्या पळवापळवीला वेग येण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यात मोठी खिंडारे पडण्याची चिन्हे आहेत. जयदत्त क्षीरसागर आणि पांडुरंग बरोरा यांच्यानंतर आता राष्ट्रवादीला गळती लागण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. सोबतच जिथे जागा शिवसेनेकडे आहे तिथे आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा भाजप प्रदेश कार्यालयात सुरू आहे. 

दरम्यान, युतीचे २२० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा भाजप नेते करत आहेत. मग त्यांना दुसऱ्या पक्षातील आमदार का फोडावे लागतात, असा सवाल याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे जिथे कोणी पक्ष सोडून जात आहे, तिथले भाजप, सेनेतील स्थानिक नेते आमच्याही संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

हे आमदार भाजप-सेनेच्‍या मार्गावर
विजयसिंह मोहिते पाटील यांच्‍यामागे आता काही आमदारदेखील आता पक्ष सोडण्याची शक्‍यता आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि उल्हासनगरच्या ज्योती कलानी,  भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे; तर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे हेदेखील सेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.

आमदारांना पराभवाची भीती
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचलेल्या विरोधी पक्षातील आमदार आपल्या राजकीय भवितव्यासाठी सत्ताधारी पक्षाची वाट धरत आहेत. विरोधी पक्षात राहिलो, तर आपण निवडून येणार नाही, याची भीती काही आमदारांना वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादीमधून यापूर्वी सत्ताधारी पक्षात गेलेल्या नेत्यांच्या माध्यमातून हे आमदार भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी भाजप प्रवेश केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीदेखील हेच चित्र दिसण्याची शक्‍यता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News