चंद्रयान झेपावले अन् राज्यसभा निवळली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या आवाहनानंतर विरोधी सदस्य शांत

नवी दिल्ली : प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावे अशा ‘चांद्रयान-२’च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ व भारतीयांचे अभिनंदन करून या आनंदाच्या क्षणात आपणही कामकाज चालून सहभाग नोंदवूया, असे आवाहन केले आणि राज्यसभेतील गोंधळ जणू जादूची कांडी फिरल्यागत थांबला.

हा सारा योगायोगाचा भाग मानला, तरी राज्यसभाध्यक्षांनी चांद्रयानाचे यश व ठप्प पडलेली राज्यसभा, यांची अशी काही सांगड घातली, की काँग्रेसचा विरोध व सभागृहातील गोंधळ तत्काळ थांबला, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.

सोनभद्र हत्याकांड व कर्नाटकातील सत्तानाट्याचा निषेध म्हणून विरोधकांनी राज्यसभेत आज सुरवातीपासूनच कामकाजात अडथळे आणले. त्यामुळे पूर्वार्धातील कामकाज ठप्प झाले. दुपारी दोन वाजता जेव्हा गृह मंत्रालयाच्या मानवाधिकार विधेयकाला चर्चा व मंजुरीसाठी आणण्यात आले तेव्हा तृणमूल काँग्रेस, काँग्रेस व ‘आप’ने ज्या पद्धतीने हे विधेयक मांडले गेले; त्याला नियम क्र. १३० व १३१ च्या आधारे आक्षेप घेतले.

नियमानुसार लोकसभेत मंजूर झालेले विधेयक जेव्हा राज्यसभेत आणले जाते तेव्हा खासदारांना त्यात दुरुस्त्या सुचविण्यासाठी कामकाजाचे किमान दोन दिवस द्यावे लागतात. मात्र, सरकारने शुक्रवारी सायंकाळी विधेयक मांडून आज ते थेट मंजुरीसाठी आणले. या आक्षेपानंतर गदारोळ झाल्याने दुपारी तीनपर्यंत सभागृह तहकूब करावे लागले.

यादरम्यानच्या काळातच चांद्रयानचे प्रक्षेपण यशस्वी झाल्याने सभागृहात आनंदभावना व्यक्त झाली. या गोंधळात काँग्रेस व तृणमूल काँग्रेस सदस्यांनी हातातील कागद फाडून त्याचे तुकडे उपाध्यक्षांच्या अंगावर भिरकावले. उपाध्यक्ष हरिवंश यांनी, हे मानवाधिकाराचे रक्षण आहे का, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज्यसभाध्यक्षांचे आवाहन
नायडू म्हणाले की, आम्ही वरिष्ठ सभागृह आहोत व येथे नियमांबरोबरच काही परंपराही आहेत. विधेयक मांडल्यावर मी आज दुपारपर्यंत दुरुस्त्या व हरकतींसाठी वाढीव वेळ दिला होता व त्या काळात नदीमुल हक यांच्या दोन दुरुस्त्या स्वीकारल्याही आहेत. चांद्रयानाने आपल्याला जो आनंदाचा क्षण दिला आहे; त्या आनंदात आपणही शांततेत विधेयकावर चर्चा करून सहभागी व्हावे, अशी माझी इच्छा आहे, असे सांगून नायडू आपल्या दालनात गेले. त्यांच्या आवाहनानंतर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सदस्यांना गोंधळ बंद करण्याची सूचना केली. नंतर ‘तृणमूल’ने सभात्याग केला व विधेकावरील चर्चा सुरू झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News