‘मिशन शौर्य मोहिमेत एव्हरेस्टवर चंद्रपूरचा झेंडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • सूरज आडे, अंतूबाई कोटनाके यांचा प्रशासनाकडून गौरव
  • पाचही जिल्ह्यातील ११ विद्यार्थांनी घेतला होता सहभाग
  • नऊ विद्यार्थांनी मोठ्या परिश्रमाने केला एव्हरेस्ट शिखर सर

चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थांनी जगावेगळे ध्येय बाळगून स्वतःची ओळख निर्माण करावी, या दृष्टिकोनातून आदिवासी विकास विभागाच्या ‘मिशन शौर्य २०१९' अंतर्गत महाराष्ट्रातील शासकीय आश्रमशाळांत शिकणा-या नऊ आदिवासी विद्यार्थांनी जगातील उंच एव्हरेस्ट शिखर २३ मे २०१९ रोजी सर केले. यात जिल्ह्यातील सूरज आडे व अंतूबाई कोटनाके यांचाही समावेश होता. त्यांचे सोमवारी आगमन झाले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते एव्हरेस्टवीरांचा स्वागत सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.

याप्रसंगी चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनीही विद्यार्थांचे अभिनंदन केले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासनाने गेल्यावर्षी 'मिशन शौर्य' ही मोहीम सुरू केली होती.

या ‘मिशनच्या पहिल्याच मोहिमेत जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणा-या कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, परमेश आडे, मनीषा धुर्वे व विकास सोयाम या पाच विद्यार्थांनी २०१८ च्या ‘मे महिन्यात एव्हरेस्ट सर करण्याचा भीमपराक्रम केला होता. यावर्षी दुस-या मोहिमेत जिल्ह्यातील विद्यार्थांसोबतच महाराष्ट्रातील अमरावती, पालघर, धुळे, नाशिक या पाचही जिल्ह्यातील ११ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. यातील नऊ विद्यार्थांनी मोठ्या परिश्रमाने एव्हरेस्ट शिखर सर करून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणारे सूरज आडे व अंतूबाई कोटनाके यांचाही यात समावेश आहे. देवाडा शासकीय आश्रमशाळेत शिकणा-या सूरज आडे याने या मोहिमेत २३ मे २०१९ रोजी पहाटे ३.३५ वाजता एव्हरेस्टवर पहिला झेंडा फडकवला. सूरज हा कोरपना तालुक्यातील रुपापेठ या गावातील रहिवासी आहे. त्याचे बारावीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्याचे आई-वडील शेतकरी आहे. जिवती येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणारी अंतूबाई कोटनाके हिने पहाटे ४.२० वाजता मोहीम पूर्ण केली. अंतूबाई या मुलीला आई वडील नसून ती आपल्या नातेवाईकाकडे राहते. तिचे ११ वीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News