जमिनीच्या गैरव्यवहारात चंद्रकांत पाटील यांनी केला एवढ्या कोटींचा घोटाळा : जयंत पाटील यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019
  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप; चंद्रकांत पाटलांकडून इन्कार
  • भूखंड गैरव्यवहारात महसूलमंत्र्यांचा हात​

मुंबई : पुणे जिल्ह्यातील हवेली व बालेवाडीतील देवस्थान जमिनीच्या गैरव्यवहारात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सहभाग असल्याचा सनसनाटी आरोप करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सरकारची कोंडी केली. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. मात्र, त्यांच्या आरोपाला आक्षेप घेत ते पटलावरून काढून टाकण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी केल्याने विधानसभा अध्यक्षांनी ते सर्व आरोप सभागृहाच्या कामकाजातून काढल्याने विरोधकांनी निषेध करीत सभात्याग केला.

यानंतर मात्र जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचा पुनराच्चार केला. ‘‘आरोपांची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. जो न्याय एकनाथ खडसे यांना लावला तोच न्याय चंद्रकांत पाटील यांनाही लावा,’’ अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

सभागृहात दोन्ही गैरव्यवहारांची सर्व मांडणी झाल्यावर हे प्रकरण अर्धन्यायिक असल्याने त्यावर विधानसभेत चर्चा करता येत नाही, असा आक्षेप चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने तो विधानसभा अध्यक्षांनी मान्य केला.

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी या कथित गैरव्यवहाराबाबत पुरावे असल्याचा दावा केला. ‘‘राज्याच्या महसूलमंत्र्यांनी पुण्यातील तालुका हवेली केसनंद गावात देवस्थानाची २३ एकर २२ गुंठे जमीन हस्तांतरित करण्याची बेकायदा परवानगी दिली. देवस्थान जमीन नजराणा न भरता हस्तांतरित करता येत नाही.’’ 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News