भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, तर मुंबईत मंगलप्रभात लोढा यांची वर्णी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • चंद्रकांत पाटील बनले भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष 
  • मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांवर 

नवी दिल्ली : महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील क्रमांक दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती केल्याचे दुपारी नवी दिल्लीत जाहीर करण्यात आले. दरम्यान, उत्तर प्रदेशाच्या प्रदेशाध्यक्षपदी स्वतंत्रदेव सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. 

रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्री म्हणून आणल्यानंतर राज्यातील प्रदेशाध्यक्षपद रिक्त होते. चंद्रकांत पाटील यांची पक्षसंघटनेतील ज्येष्ठता आणि संघटनात्मक अनुभव पाहता, विधानसभा निवडणुकीच्या वर्षात त्यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल, अशी अटकळ होती ती खरी ठरली आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे शेकडो कार्यकर्त्यांचे हक्‍काचे स्थान आहेत. १९८० पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय असलेल्या चंद्रकांत पाटील यांचा २००३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला. ‘अभाविप’मध्ये राष्ट्रीय संघटनमंत्री असताना अमित शहा, धर्मेंद्र प्रधान यांच्याशी त्यांचा घनिष्ट संबंध आला.

राज्यभरातील त्यांचा दांडगा संपर्क पाहून २००७ मध्ये त्यांना भाजपत महत्त्वाचे पद दिले गेले. मग आमदारकी, सरचिटणीसपद असे टप्पे पार करत ते आज प्रदेशाध्यक्ष झाले. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल चंद्रकात पाटील यांना महत्त्व आहे. याशिवायही ते सगळ्याच जबाबदाऱ्या पार पाडतात. तीन महत्त्वाची खाती, एकनाथ खडसे यांच्या गच्छंतीनंतर महसूल खाते, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी अशी कामे ते करत गेले. 

मराठा आरक्षण प्रक्रिया तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना तर पडद्याआडच्या घडामोडींपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते या सर्वांशी चर्चेची जबाबदारी चंद्रकांत पाटलांनी पार पाडली. शिवसेनेशीही चर्चेचे पूल बांधण्यात फडणवीसांखालोखाल भूमिका त्यांनीच पार पाडली. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्याशी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत सल्लामसलत करण्यात आली. ते प्रदेशाध्यक्ष होतील, पण त्यांची खाती जातील काय अशी विचारणाही सुरू झाली. ‘एक व्यक्‍ती एक पद’ या भाजपमधील सूत्राचा हवालाही दिला गेला. पण आज त्यांच्या नेमणुकीची घोषणा झाली आणि त्यांच्याकडील खातीही शाबूतच राहिली. आता विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी त्यांना फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसता येईल.

‘हा तर गुरूंचा आदेश’
‘१८ टक्‍के काम करण्याची क्षमता असेल तर २० टक्‍के जबाबदारीचे आव्हान स्वीकारावे, असे माझे अन्‌ बऱ्याच भाजप नेत्यांचे गुरू स्व. यशवंतराव केळकर सांगत असत. प्रदेशाध्यक्ष पद तसेच या पूर्वी आलेल्या जबाबदाऱ्या त्यांच्याच आदेशानुसार मी स्वीकारल्या. मोठे काम तुम्हाला अधिकच सक्रिय करते,’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या नियुक्‍तीबद्दलची प्रतिक्रिया व्यक्‍त केली. ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, की संघटनेचे दहा लाख माणसे, त्यांचे २० लाख पाय, २० लाख हात तुम्हाला मदत करत असतात. २० लाख डोळे तुम्ही काय करताय ते बघतही असतात. मी विनम्रपणे सोपवलेली जबाबदारी स्वीकारतो आहे. जबाबदारी पार पाडण्याचे प्रयत्न आजवर जसे श्रम केले, तसेच करत राहीन.

लोढा मुंबईचे अध्यक्ष 
मुंबई प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मुंबईत मराठी-अमराठी असा वाद सुरू असताना भाजपने सातत्याने निवडून येणाऱ्या मलबार हिल परिसरातील लोढा यांना अध्यक्ष केले आहे. 

मुंबई प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मुंबईत मराठी-अमराठी असा वाद सुरू असताना भाजपने सातत्याने निवडून येणाऱ्या मलबार हिल परिसरातील लोढा यांना अध्यक्ष केले आहे. मुंबईतील शिवसेनेच्या वर्चस्वाला यशस्वी आव्हान देणाऱ्या आशीष शेलार यांची अध्यक्षपदाची कारकिर्द संपली होती. त्यानंतर निवडणुकीपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. ते शालेय शिक्षण मंत्री झाल्यानंतर आता लोढा यांना अध्यक्ष नेमण्यात आले आहे. संघपरिवाराशी अत्यंत सौहार्दाचे संबंध असलेले लोढा बांधकाम व्यवसायातही होते. आता त्यांनी हा व्यवसाय मुलांवर सोपवला आहे. लोढा यांचे घराणे राजकारणात नव्हते. त्यांचे वडील न्यायाधीश होते. लोढा यांनी गोरक्षणासाठीअनेक उपक्रम राबवले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News