चाकांवरचा संसार...

सुहास दिनेश शुक्ल
Tuesday, 3 September 2019

रात्रीची शिफ्ट आवरून माझ्या ऑफिस पासुन थोडं पायी चालत आलो कारण पावसानी टॅक्सी मिळणं थोडं मुश्किल होतं.

आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते म्हणुन ऑफिसला जाताना छत्री घेऊनच निघालो. संध्याकाळ होईपर्यंत पावसाने चांगलीच सुरुवात केली होती. रात्रीची शिफ्ट आवरून माझ्या ऑफिस पासुन थोडं पायी चालत आलो कारण पावसानी टॅक्सी मिळणं थोडं मुश्किल होतं. काल मात्र खुप जीवावर आली कारण वरून पाऊस खाली निसटता रस्ता... आणि छत्री पतंगासारखी उडेल एवढा वारा... एक किलोमीटर चा रस्ता अगदी मोठा-मोठा वाटत होता.

तेवढ्यात बायकोचा मेसेज आला कि ऑफिस मधुन लवकर निघा खीर पुरी केलीय. त्या विचाराने अगदी तोंडाला पाणी सुटले आणि इकडे आभाळाला पण! पावसाचा जोर वाढत चालला होता. हायवेला आल्यावर एका जीपनीत बसुन इप्सित स्थळी उतरून दुसऱ्या एका तीनचाकी रिक्षात बसलो. पावसाने आपला स्पीड वाढवला होता. मला मात्र अजुन एक तीनचाकी पकडुन घरी पोहचायचे होते म्हणुन मी एका स्टॉप ला थांबलो होतो.

लॅपटॉप बॅग आणि आर्धी पॅन्ट ओली झाली होती कधी एकदा घरी पोहचतो आणि चेंज करून खीर-पुरीवर ताव मारतो असे झाले होते. एकही तीनचाकी रिक्षावाला थांबायला तयार नव्हता, अचानक एक आजीबाई पडत्या पावसात माझ्या मागुन जाताना दिसल्या. खांद्यावर मोठीशी जड बॅग होती. आजींनी अंगावर प्लास्टिक च्या कागदाचा केलेला रेनकोट अडकवला होता. डाव्या हातात चाकांवर चालणारी तुटकी बॅग आणि त्यावर बरंच काहीसं सामान दोऱ्यांनी बांधलं होतं, त्यात बहुदा आजींचा सगळा संसार असावा.

पावसानी आजी बऱ्यापैकी भिजल्या होत्या पण चेहऱ्यावर कुठलाही ताण दिसत नव्हता, अगदी शांत डोक्याने त्या पुढे-पुढे जात होत्या मला मोह आवरला नाही मी त्यांना पुढे जाऊन थोडे पैसे देऊ केले पण त्यांनी ते घेतले नाही आणि त्या चालत राहिल्या मी मात्र त्यांच्या नकळत त्यांचा एक फोटो काढला. मला माहिती आहे कि त्यांना आता रात्री झोपण्याकरता कोरडी जागा शोधावी लागेल आणि झोप लागण्याइतकं पोटात काहीतरी टाकावं लागेल.

पण त्या दोन क्षणांनी मात्र माझी भूख कुठेतरी हवेत विरून गेली. असे अनेक लोकं आहेत ज्यांना घर दार नाही आणि एक वेळच्या खाण्याची भ्रांत असते आणि आपण मात्र थोड्या थोड्या त्रासाने पण कंटाळुन जातो मग वाटते की आपली सहनशक्ती शुन्य झालीय का? घरी आलो... देवाला नैवेद्य दाखवुन देवाला प्रार्थना केली की आजींना कोरडी जागा आणि काहीतरी खायला मिळु दे...
एक गोष्ट मात्र निश्चित की देव प्रत्येकाच्या संसाराला चाकं द्यायला काही विसरत नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News