चाफा बोलेना, चाफा चालेना... कवी ‘बी’ यांची आज 72 वी पुण्यतिथी

विवेक मेतकर
Friday, 30 August 2019
  • ‘चाफा बोलेना, चाफा चालेना। चाफा खंत करी काही केल्या फुलेना ।। हे गीत सबंध महाराष्ट्राच्या ओठी देणारे कवी ‘बी’ यांची आज 72 वी पुण्यतिथी.
  • त्यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरीतील विचाराचे व कल्पनेचे कुंज निनादवून सोडत रसिकांवर आपल्या गीतमाधुर्याची मनामनावर घातलेली मोहिनी आजही कायम आहे. 

‘चाफा बोलेना, चाफा चालेना। चाफा खंत करी काही केल्या फुलेना ।। हे गीत सबंध महाराष्ट्राच्या ओठी देणारे कवी ‘बी’ यांची आज 72 वी पुण्यतिथी. त्यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरीतील विचाराचे व कल्पनेचे कुंज निनादवून सोडत रसिकांवर आपल्या गीतमाधुर्याची मनामनावर घातलेली मोहिनी आजही कायम आहे. 

मलकापूर येथे 1 जून 1872 रोजी नारायण मुरलीधर गुप्ते यांचा जन्म झाला. पुढे अकोला न्यायालयात कारकूनाची नोकरी करीत होते. याच काळात त्यांनी ‘वऱ्हाड समाचार’साठी अनेक निनावी लेख लिहीले. मात्र, 1918 साली साप्ताहीक वऱ्हाड समाचार बंद पडले आणि अनेक अंक भूमिगत झाले. रामदासपेठ परिसरातील एका ख्रिश्चन गृहस्थाचा बंगल्यातील आऊट हाऊसमध्ये ते रहायचे. पुढे ही जागा निनाद गावंडे यांनी विकत घेतली. इमारत शिकस्त असल्यामुळे अर्थातच आता तिथे नवीन वास्तू आहे. पुढे ‘बी’ आपले जावाई खंडेराव प्रधान यांच्यासोबत बंगलोरी कौलारुच्या घरात राहत. त्यातील अर्ध्या भागात आज हॉटेल जसनागरा उभे आहे. तर जुने शहरातील काळा मारुती परिसरात दुमजली माडीच्या घरात राहत असताना त्यांच्या अंगणातील चाफ्याच्या झाडावर केलेली ही कवीता आज प्रत्येक मराठी माणसाच्या ओठी आहे.

‘बी’ नावाची वेगळीच कहाणी 
नारायण मुरलीधर गुप्ते हे अकोल्यातील न्यायालयात कारकून होते. इंग्रजांचा काळ आणि त्यांचे प्रखर विचार परस्पर विरोधी होते. त्यातच कुटुंबाची जबाबदारी एकट्यावरच असल्यामुळे त्यांचे मित्र शंकर विठ्ठल दिक्षित यांनी त्यांना कवी 'बी' हे नाव दिले होते. पुढे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आल्यावरही त्यानी ते नाकारले. 

प्रमिताई ओक यांच्याकडून सत्कार 
कवी ‘बी’ यांचा 1941 साली बाबुजी देशमुख वाचनालयात देशभक्त प्रमिलाताई ओक यांनी सत्कार केला होता. सत्कार आटोपल्यानंतर ‘बी’ घरी जात असताना वाटेत खेळणाऱ्या मुलांमधून एका मुलाला सत्काराचा हार दिला ते म्हणजे अरविंद पसारकर. आज त्यांचा रामदासपेठ येथे स्टुडीओ आहे. 

कवितील ‘भिष्माचार्य’ 
‘फुलांची ओंजळ’ या कवितासंग्रहातील कवितांना मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाने अभ्यासक्रमात स्थान दिले. चिंतामण कोल्हटकरांनी त्यांना मृच्छकटिकातील ‘चारुदत्ता’ची उपमा दिली. आचार्य अत्रे, माधव ज्युलियन यांनी त्यांच्या काव्याची प्रशंशा केली. आचार्य अत्रे यांनी अकोल्याचे प्रभाकर विष्णू प्रधान यांना लेखमाला लिहण्यास प्रवृत्त केले होते. वा. ना. देशपांडे यांनी त्यांना आधुनिक ‘मुक्तेश्वरा’ची उपमा दिली. विष्ण केशव पेशवे यांनी ‘बीं’च्या काव्यानंद या मराठी कवितेचे संस्कृतमध्ये समश्लोकी भाषांतर केले तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी त्यांना आधुनिक कवितील ‘भिष्माचार्य’ या श्रेष्ठतम उपाधीने गौरविलेले आहे. 

-डॉ.जनार्दन पांडुरंग खोडके, लेखक- ‘बी’फुललेला चाफा
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News