'ति'ला पाळी आली म्हणून कोंबड्यांच्या भावात विकणाऱ्यां समाजाची सफर घडवणारा 'कॅफरनॉम' सिनेमा

नारायण शिवाजी अंधारे
Sunday, 23 June 2019

काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचण्यात आली होती. मुंबईतील राफाएल सॅम्युएल नावाचा कुणी तरुण आई वडिलांनी त्याला न विचारताच जन्म दिला म्हणून त्यांच्यावर खटला दाखल करणार आहे अशी ती बातमी होती. त्या बातमीवर अनेक प्रतिक्रिया आल्या. 

काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचण्यात आली होती. मुंबईतील राफाएल सॅम्युएल नावाचा कुणी तरुण आई वडिलांनी त्याला न विचारताच जन्म दिला म्हणून त्यांच्यावर खटला दाखल करणार आहे अशी ती बातमी होती. त्या बातमीवर अनेक प्रतिक्रिया आल्या. 

कुणी म्हणालं हा वेडा झालाय का? आई वडिलांना दोष द्यायला याला लाज कशी वाटत नाही? एवढाच राग आहे तर स्वतःला संपवून टाक. आत्महत्या कर. काहीजण म्हणत होते, ही तरुण पिढीच बिघडली आहे. पण तो मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. पुढं त्यानं काय केलं हे कळलं नाही. त्याच्याबद्दल अजून वाचलं असता तो 'अँटी नॅटालिस्ट' ग्रूपचा सदस्य आहे हे कळलं.
 
हा अशा लोकांचा ग्रुप आहे जो मुलं जन्माला घालण्याच्या विरोधात आहे. त्यांच्या मते जगाची लोकसंख्या खूप वाढली आहे. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. ते म्हणतात, आई वडील त्यांच्या छंदासाठी, करमणुकीसाठी मुलं जन्माला घालतात. यात त्यांचा निव्वळ स्वार्थ असतो. काही जण तर मुलांच्या आयुष्याची जबाबदारीही घेत नाहीत. ते संघर्ष करण्यासाठी मुलांना मोकळं सोडून देतात. हे एक प्रकारचं किडनॅपिंगच आहे. गुन्हा आहे.

थोडक्यात काय तर मुलांच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेणार असतील तरच त्यांनी मुलं जन्माला घालावीत. तू आत्महत्या का करत नाहीस? या प्रश्नाचं उत्तर देताना राफाएल म्हणतो, मुळात ही परिस्थितीच का निर्माण केली जाते? त्या मुलावर आत्महत्या करण्याची वेळच का यावी? मूल जन्माला घालायचंच नाही. न रहेगा बांस, न बजेगी बांसूरी!

हा खरं तर वादाचा विषय आहे. यातून पहिल्यांदा असं दिसतं की राफाएल हा आळशी मुलगा आहे. किंवा तो डिप्रेशनमध्ये आहे. त्याला काम धंदा करायची इच्छा नाही. जबाबदाऱ्यांना सामोरं जायची इच्छा नाही. तो विनाकारण आई वडिलांना दोष देतोय. त्यांच्यावर खटला दाखल करणं हे तर अतिच होतंय. पण या विषयाची दुसरी, त्याची स्वतःची बाजू आहेच.
 
एक तर आपल्याला त्याची संपूर्ण पार्श्वभूमी माहीत नाही. तो कशा परिस्थितीत, कुठल्या प्रकारच्या कौटुंबिक वातावरणात वाढलाय, जग त्याला कसं दिसत गेलं वगैरे... बहुतेक यातूनच त्याला डिप्रेशनही आलं असावं. म्हणून तो टोकाचा निर्णय घेत असावा. स्वतः मरण्याऐवजी आई वडिलांवर खटला दाखल करणं त्याला योग्य वाटलं असावं.  शिवाय तो ज्या ग्रुपला जॉईन झाला आहे त्यांचं म्हणणंही काही प्रमाणात योग्य आहे असं वाटतं. 

लोकसंख्या विस्फोट हा सध्या जगासमोरचा मोठा प्रश्न आहे. माणसानं निसर्गाचं वाटोळंच करायचं ठरवलं आहे.
इथून पुढे येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी, शरीराला मानवेल असं तापमान मिळू शकेल की नाही हा प्रश्नच आहे. नैसर्गिक संसाधनं हळू हळू नष्ट व्हायला लागली आहेत. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील आर्थिक दरी रुंदावत आहे. रोजच्या जगण्यासाठी, दोन वेळच्या जेवणासाठी लोकांना असामान्य संघर्ष करावा लागतोय. यातून जर अपत्यच नको हा विचार समोर येत असेल तर तो प्रॅक्टिकल, विवेकी आहे.

आम्ही दोन, आमचे दोन यानंतर एकुलतं एक अपत्यच बरं हा विचारही समोर येतोय. मूल बाळच नकोच, आपण आपलेच बरे असंही काहीजण म्हणत आहेत. कुणी मुलं दत्तक घेत आहेत. स्वतःचं करियर, आयुष्य सांभाळताना नाकी नऊ येत असतील, घरी वेळ देता येत नसेल आणि मूल सांभाळणं होत नसेल यातून हा विचार समोर येत असेल तर त्यात गैर काहीच नाही. भले हा विचार सध्या नवीन असेल, विद्रोही वाटत असेल आणि वंश चालवणं, सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टींना तोंड देता देता काही काळ, कदाचित पुढील एखाद दोन पिढ्या जाव्या लागतील पण  कालांतराने हा विचार करणं अपरिहार्य होऊ शकतं. असो. राफएलचं आई वडिलांवर खटला भरणं योग्य किंवा अयोग्य या वादात मी पडणार नाही. ही बातमी आठवण्याचं कारण आहे कॅफरनॉम !

धगधगत्या मध्यपूर्वेतील लेबनॉन मधलं बैरुत हे शहर. सिरिया, इथिओपिया अशा ठिकाणांहून भळभळत्या जखमा घेऊन आलेले निर्वासित. काहीजण रिफ्युजी कॅम्पात राहतायेत, कुणी तिथल्या झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. कोण, कुठं किती दिवस राहील, जगेल किंवा दुसऱ्याच क्षणाला मरेल, सरकार त्यांना कुठलंही कलम लावून कैद करेल, कसलीही काही शाश्वती नाही. कुणी डुप्लिकेट ओळखपत्र बनवून राहतंय, कुणाची आई वैध आहे तर कुणाचं मूल अवैध आहे. हिंसाचार फोफावलाय, लहान मुलं लाकडी फळ्यांपासून बनवलेल्या बंदुकी घेऊन खेळतायेत. त्यांच्यातही गट आहेत. एकमेकांविरुद्ध लुटुपुयुटीचं युद्ध चालू आहे.

एकमेकांचा पाठलाग करत खोटे बॉम्बस्फोट घडवत आहेत. खोटं खोटं मरत आहेत. कधी खऱ्या बंदुकीच्या गोळ्यांना किंवा बॉम्बस्फोटांना बळी पडत आहेत. त्यात वाचलेच तर रोजच्या आयुष्यातही गुन्हेगारी जगताला बळी पडत आहेत. नॉर्मल असं आयुष्य नाहीच. त्यांच्यात एक मुलगा आहे, झैन. कमी वयातच तो मोठ्यांसारखं जबाबदारीनं वागतो.

त्याचंही कुटुंब अवैध पद्धतीने राहतंय. त्याला पाच सहा बहीण भाऊ आहेत. आई वडिलांसह तो घरात ब्रेडविनर आहे. अंमली पदार्थ अवैधरित्या विकून ते उदरनिर्वाह करत आहेत. त्याला एक मोठी बहीण आहे. तिला पहिली पाळी येते. ही गोष्ट आई वडीलांपर्यंत पोचू नये म्हणून तो प्रयत्न करतो. पण व्हायचं तेच होतं. त्यांना कळतं आणि मुलगी सज्ञान झाली म्हणून ते तिला केवळ काही कोंबड्यांच्या बदल्यात घरमालकाला विकून टाकतात. झैनचा घरच्यांसोबत संघर्ष होतो. तो घर सोडून पळून जातो. पुढे त्याची भेट राहीलशी होते.
 
राहील इथिओपियातुन आलेली सिंगल मदर आहे. आपल्या बाळाला सांभाळण्यासाठी ती झैनला ठेऊन घेते.
लहान बाळासोबत झैन तिथं रमतो. पण राहिलच्या ओळखपत्राची वैधता संपत आली आहे. तिचं बाळही कायद्याच्या नजरेत अवैध आहे. वैधता रिन्यू न करता आल्यामुळे राहीलला अटक होते. आता मागे राहतात झैन आणि राहीलचं बाळ. त्यांच्यामागे परत दुष्टचक्र चालू होतं. झैन हा आत्मविश्वास असलेला समजूतदार मुलगा आहे.

तो माणसं ओळखतो. ही नोज हाऊ टू विन द ब्रेड. आता राहीलच्या बाळाला सांभाळण्यासाठी तो वणवण फिरतो आहे. पुढं अशा काही घटना घडत जातात की ज्यांच्या परिणामातून झैन एकाला भोसकतो आणि त्याला अटक होते. कोर्टात केस चालू असताना तो त्याच्या परिस्थितीसाठी आई वडिलांना दोषी ठरवून त्यांच्यावर खटला दाखल करतो. इथे मला झैनमध्ये राफाएल दिसतो. त्यांची कौटुंबिक, सामाजिक, राजनैतिक पार्श्वभूमी भलेही वेगळी असेल, भले एक बरोबर आणि दुसरा चूक असेल पण त्यांनी आपल्या आई वडिलांवर खटला दाखल केला ही त्यांच्यातील कॉमन गोष्ट आहे.

कॅफरनॉम हे गॅलिली समुद्राच्या काठावर वसलेलं मध्य पूर्वेतील प्राचीन शहर. ज्यू आणि मुस्लिम समाजात कायम होणाऱ्या संघर्षामुळं ढासळलेल्या कायदा आणि व्यवस्थेमुळं निर्माण झालेली अनागोंदी, भ्रष्टाचार आणि हिंसाचारामुळे तिथला तत्कालीन समाज होरपळून निघाला होता यासाठी त्या शहराची नोंद आहे. हे चित्र अजूनही फारसं बदललं नसल्याने त्या प्राचीन शहराचा संदर्भ देण्यासाठी दिग्दर्शिका नदीन लबाकी ने बैरुत शहराचा प्लॉट असलेल्या आपल्या सिनेमाला कॅफरनॉम हे नाव दिलं असावं. लहानपणापासून ती हे अस्वस्थ करणारं वातावरण अनुभवत आली आहे. शीतयुद्ध संपल्यानंतर ती ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाचं शिक्षण घेऊन सुरुवातीला जाहिराती आणि म्युझिक व्हिडीओज बनवत फिल्म मेकिंगमध्ये उतरली.

आता परत सतत राजनैतिक तणावाखाली असलेल्या वातावरणात स्वतःचं आयुष्य धोक्यात घालून रिफ्युजी कॅम्पस, झोपडपट्ट्या, जेल अशा सर्व ठिकाणी जाऊन तिने या सिनेमासाठी रिसर्च केला आहे. यातून तिला दिसलं ते या अशा वातावरणात होरपळणारं निरागस बालपण. काही दोष नसताना हिंसेने भरलेल्या जगाला हे बालपण सामोरं जातं. शिक्षण दूरची गोष्ट आहे. दोन वेळचं अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसाठीही त्यांना कोवळ्या वयातच काय काय सहन करावं लागतं याचं रीतसर डॉक्युमेंटेशन करून तिने ही फिल्म बनवली आहे. फिल्ममध्ये काम करणारी बहुतांश लोकं रिफ्युजी आहेत. झोपडपट्ट्यांमधून निवडून घेतले आहेत.

मुख्य भूमिका केलेला झैन अल रफिया हा असाच रस्त्यावरून उचललेला आहे. सिनेमातील पात्राप्रमाणे त्याचीही जन्मनोंदणी झालेली नाही. कसलंच ओळखपत्र नाही. त्याला डायरेक्ट सिनेमात घेतलं. तो प्रत्यक्ष आयुष्यात जसा आहे तसाच सिनेमात वावरलाय. डॉक्युमेंटरी सारखं मेकिंग करताना कॅमेरा सिनेमाभर झैनच्या आय लेव्हलला ठेवल्यामुळे सम्पूर्ण सिनेमा आपल्याला त्याच्या डोळ्यांतून दिसतो. राहीलचं बाळ आणि झैन यांच्यातील केमिस्ट्री अफाट जुळून आली आहे. त्यांच्यात होणारी भावनांची देवाणघेवाण सिनेमाभर अंगावर येणाऱ्या गरिबी, दुःख, संघर्ष या सारख्या जखमांवर हळुवार फुंकर घालते. जेमतेम वर्षभराच्या बाळाकडूनही अभिनय करून घेणं ही कमाल गोष्ट आहे.
खरं तर काही फिल्म्सचा रिव्ह्यू केला नाही जाऊ शकत. त्या फिल्म्स फक्त अनुभवायच्या असतात. कॅफरनॉम त्यातील एक आहे.

मध्य पूर्वेसारख्या कायम तणावाखाली असलेल्या आणि सतत कसली तरी बंदी घातलेली असतानाही इराणच्या जफर पनाही, माजिद माजिदी, असगर फरहादी यासारखे दिग्दर्शक फिल्म्स बनवत आहेत. उलट अशा बंदिस्त वातावरण फिल्म मेकिंगची कला बहरत गेली. या लोकांच्या पंक्तीत आता नदीन लबाकी हे नावही सन्मानाने घ्यावं लागेल. कॅफरनॉम मधून तिच्या भवतालातील कोलाहल व्यक्त झाला आहे. या अर्थाने बैरुतच नव्हे मध्ये पूर्वेतील धगधगणारं प्रत्येक शहर कॅफरनॉम आहे. तिची पहिली फिल्म 'व्हेअर टू गो नाऊ' सर्वात जास्त कमाई करणारी अरब फिल्म होती. या फिल्म मध्येही तिने ज्यू आणि मुस्लिम समाजातील सद्य काळातील संघर्षावर भाष्य केलं आहे. कॅफरनॉम ने गेल्या वर्षी कॅन्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये ज्युरी प्राईझ मिळवलं. पुढं जगभरात वेगवेगळ्या फेस्टिव्हल्समध्ये अवॉर्डस मिळवलेली व गेल्या वर्षी सर्वात जास्त चर्चिली गेलेली ही फिल्म होती. ऑस्करसाठी ती लेबनॉनची ऑफिशियल एन्ट्री होती. लबाकीच्याच व्हेअर टू गो नाऊ या फिल्मचं रेकॉर्ड तोडत आजपर्यंतची सर्वात जास्त कमाई करणारी ही अरब फिल्म झाली आहे.

ता. क. - झैन सध्या स्वीडनला शिफ्ट झाला आहे. त्याच्याकडे स्वतःचं ओळखपत्र आहे. घर आहे. तो शिक्षण घेतोय. त्याचं आयुष्य बदललंय.

Vkaao ने बेस्ट ऑफ द वर्ल्ड फिल्म्स या उपक्रमाअंतर्गत कॅफरनॉम, येमोद्दीन, शॉपलिफ्टर्स आणि एश इज द प्युरेस्ट व्हाईट या गेल्यावर्षीच्या अप्रतिम फिल्म्स स्क्रिनिंगसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. नॉट टू मिस ऍट एनी कॉस्ट या प्रकारात त्या मोडतात. आपापल्या शहरात त्यांचं स्क्रिनिंग ठेऊन फॅमिली, नातेवाईक आणि मित्रांसोबत त्या फिल्म्स अनुभवायची चांगली संधी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News