मंत्रिमंडळातील नावे म्हणजे फडणवीस चमू

मृणालिनी नानिवडेकर
Monday, 17 June 2019
  • फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधक दुखावण्याची शक्‍यता

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गटाचे राजकारण न करता पक्षाच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य देतात असे मानले जाते; मात्र फडणवीस यांनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना या वेळी मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. शपथविधीनंतर सर्व नवे चेहरे हे फडणवीस यांचा चमू आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात येत होती. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा अपवाद वगळता बहुतेक सर्व मंत्री फडणवीस यांच्या वर्तुळातील आहेत.

वादात असलेल्या मंत्र्यांना वगळून मुख्यमंत्र्यांनी स्वत: पारखून घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. विरोधी पक्षनेतेपदावरील व्यक्‍ती त्याच पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी बाकावर महत्त्वाचे मंत्री ठरण्याची किमया डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी साधली आहे. ते विरोधी पक्षनेते असतानाही त्यांचा फडणवीस यांच्याशी उत्तम संवाद होता. ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, अशी टीका काँग्रेसमध्ये होत असे. आज ती खरी ठरली; मात्र विरोधी पक्षनेत्याला तेही विखे घराण्याला आपण लीलया खिशात घालू शकतो, असा संदेश फडणवीस यांनी दिला आहे.

डॉ. अनिल बोंडे हे गेल्या चार वर्षांत विधानसभेत फडणवीस यांच्या योजनांची हिरिरीने पाठराखण करीत होते. ते शासकीय महाविद्यालयातून शिकलेले तज्ज्ञ डॉक्‍टर आहेत. डॉ. संजय कुटे हे फडणवीस यांचे जवळचे आमदार. राज्यातील तरुण तुर्कांची अनौपचारिक आमदार संघटना फडणवीस यांनी स्थापन केली, त्यात कुटे होते.

बुलडाणा जिल्ह्यातून नेतृत्वासाठी फुंडकर संचेती अशी नावे यायची, त्यात कुटे मागे पडायचे. संजय ऊर्फ बाळा भेगडेही फडणवीस यांच्यासमवेत असायचे. आज त्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. प्रा. उईकेंचे गुणही फडणवीस यांनी हेरले होते. विष्णू सवरा निष्प्रभ ठरले होते, त्यांच्या तब्येतीचे कारण देत त्यांच्याऐवजी उईके 
आत आले.

डॉ. परिणय फुके यांचा आश्‍चर्यकारक प्रवेश
डॉ. परिणय फुके यांचा आजच्या शपथविधीतला सर्वाधिक आश्‍चर्यकारक प्रवेश आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपासून फुके त्यांच्यासमवेत आहेत. ते नागपूरचे. त्यांचे वडील काँग्रेसनेते स्व. श्रीकांत जिचकार यांचे निकटवर्तीय; मात्र फुके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

फडणवीस यांना कठीण असलेला भंडारा विधान परिषद मतदारसंघ जिंकून दाखवला. त्यांना थेट राज्यमंत्री केल्याने फडणवीस यांचे विरोधक दुखावले आहेत अशी चर्चा आहे; मात्र फडणवीस त्यांच्या निकटवर्तीयांना संधी देतात अशी टीकाही यानिमित्ताने सुरू झाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News