मंत्रिमंडळ विस्तारात विखे-पाटलांना कृषी खाते?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • विखे-पाटलांना कृषी खाते?

  • मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात

  • चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री

 

मुंबई - विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार आणि खांदेपालट या महिन्याच्या पुढील आठवड्यात करणार आहेत. 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या श्रेष्ठींशी सल्लामसलत केल्यानंतर फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून काँग्रेसमधून बाहेर पडलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांना कृषी खाते दिले जाण्याची शक्‍यता आहे. भाजप-शिवसेनेच्या काही मंत्र्यांचे खांदेपालटही होणार असल्याचे समजते. 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जून रोजी सुरू होणार असून त्यापूर्वी हा विस्तार होणार आहे. या विस्तारापूर्वी येत्या रविवारी (ता. ९) भाजपच्या कोअर कमिटीचे सर्व नेते दिल्लीत पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी जाणार असून त्यानंतर हा विस्तार ११ जून रोजी होण्याची शक्‍यता आहे.

येत्या ऑक्‍टोबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे हा शेवटचा विस्तार आणि खांदेपालट आहे. लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले गिरीश बापट यांच्याकडील खात्याचा कारभार फडणवीस यांनी अन्य मंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे.

चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री
बापट यांच्याकडील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे. पाटील यांच्याकडील जळगावचे पालकमंत्रिपद जळगाव जिल्ह्यातील भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News