आखाडासाठी मटण थाळी!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 July 2019
  • थाळी खायला जाऊ म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर व्हेज थाळीच येते. अलीकडच्या काळात थाळी म्हणजे परिपूर्ण रुचकर व्हेज जेवण, हे समीकरण बदलताना दिसू लागले आहे.

थाळी खायला जाऊ म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर व्हेज थाळीच येते. अलीकडच्या काळात थाळी म्हणजे परिपूर्ण रुचकर व्हेज जेवण, हे समीकरण बदलताना दिसू लागले आहे. अस्सल महाराष्ट्रीय किंवा कोल्हापुरी पद्धतीची चिकन, मटण आणि फिश थाळी मिळणाऱ्या ठिकाणांची सध्या चलती आहे. आखाड असो वा नसो, या हॉटेल्समध्ये वर्षभर गर्दी पाहायला मिळते. नॉन-व्हेजमध्ये साधारणपणे चिकन तंदूरी, बटर चिकन, मटण रोगन जोश खाणारे लोक आजकाल चिकन खर्डा, मटण फ्राय व मटण उकड या डिशकडे वळायला लागली आहेत. यावरूनच अस्सल मराठी नॉन-व्हेजची वाढलेली लोकप्रियता समजते. 

पुणे आणि परिसरातील हॉटेल्स जिथे तुम्ही अशा मटण थाळीचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता.
 जगदंबा (खेड शिवापूर) - साजूक तुपातले मटण व चिकन अशी खासियत असलेल्या पुणे-बंगळूर हायवेवरील ‘जगदंबा’मध्ये सतत गर्दी बघायला मिळते. किमान १-१.३० तासाचा वेटिंग आहे, हे माहीत असूनही खवय्ये पुणेकर आवर्जून इथे मटण थाळी खायला जाताना दिसतात. आळणी सूप, मटण फ्राय, रस्सा, भाकरी/पोळी, आळणी भात (मटण स्टॉकमध्ये शिजवलेला इंद्रायणी भात) असे पदार्थ असलेली ही मटण थाळी नक्की ट्राय करण्यासारखी आहे. इकडची मालवणी चिकन हंडी, एक खास डिश आहे. 

सुर्वेज (अनेक शाखा) - मूळचे साताऱ्याचे असलेले हे हॉटेल पुण्यामध्ये फार कमी वेळामध्ये लोकप्रिय झाले, इतके की आता पुण्यामध्ये त्याच्या चक्क चार शाखा झाल्या आहेत. प्युअर नॉन-व्हेज अशी टॅग लाइन असलेला सुर्वेज म्हणजे नॉन-व्हेज खाणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे. त्यांची स्पेशल मटण थाळीची चव अप्रतिम आणि मुबलक क्वांटिटी असलेली आहे. मटण उकड आणि खर्डा चिकन पण इथली खासियत.

मराठा सम्राट (कोथरूड, बाणेर, कॅम्प) - ‘मराठा सम्राट’ची मटण थाळी प्रसिद्ध आहे. टेस्टी मटण ग्रेव्ही, तांबडा पांढरा रस्सा, मटण खिमा, भाकरी/पोळी आणि सोबत येणाऱ्या सोलकढी व पापडाने मजा अजूनच वाढते. इथे आदरयुक्त आणि खूप जलद सेवा दिली जाते.

अहिल्यादेवीज् थाळी (कात्रज) - सध्या ‘अहिल्यादेवी’ची लॅम्ब मीट थाळी चर्चेत आहे. इथले मटण पूर्णपणे चुलीवर शिजवले जाते. त्यांच्या ‘महाराजा मटण’ थाळीमध्ये तब्बल १० ते ११ प्रकार आहेत. त्यामध्ये समावेश आहे तो म्हणजे लॅम्ब चॉप्स, लॅम्ब कालवण, मसाला, खिमा लाडू, आळणी सूप, तांबडा रस्सा, दम बिर्याणी, सोलकढी आणि जिलबीचा. ‘अहिल्यादेवीज्’मध्ये सिकंदरी रानही मिळते. फक्त त्याची ऑर्डर १२ तास आधी द्यावी लागते.

रेसिपी नॉन-व्हेज (भांडारकर रोड) - घरगुती वातावरण असलेली ही छोटीशी जागा, मात्र येथील थाळीवर साजूक तुपाचा मारा असतो. रेसिपी स्पेशल मटण थाळीमध्ये साजूक तुपातले आळणी, मटण फ्राय, काळा आणि लाल रस्सा वाटी, खिमा वाटी, दही कांदा, सोलकढी, इंद्रायणी भात आणि पोळी/भाकरी मिळते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News