नोकरीसाठी बेरोजगार युवकांच्या खिशावर भार!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • सुधारित बिंदुनामावली तयार करण्याचे आदेश; भरतीसाठी नव्याने करावा लागणार अर्ज

नागपूर - एसईबीसी (मराठा) आरक्षणाच्या टक्केवारीत सुधारणा करण्यात आल्याने त्यानुसार सुधारित बिंदुनामावली तयार करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. यानुसारच नव्याने पदभरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे. यामुळे पदभरतीची जुनी प्रक्रिया निरस्त होणार असल्याचे बोलले जात आहे. पदभरती स्पर्धा परीक्षेकरिता उमेदवारांनी यापूर्वी भरलेल्या  जागांसाठी नव्याने अर्ज करावा लागणार असल्याने जुन्या अर्जाकरिता केलेला खर्च वाया जाणार आहे. यामुळे नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या बेरोजगार युवकांना अधिकचा खर्च करावा लागणार आहे. 

राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे मराठा समाज मागास ठरल्याने एसईबीसी अंतर्गत १६ टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने आरक्षणाचा टक्का कमी करून नोकरीत १३ तर शिक्षणात १२ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यामुळे आता एसईबीसीच्या कायद्यात सुधारणा करण्यात  आली आहे. 

या नव्या सुधारित टक्केवारीनुसार शासकीय सेवेतील बिंदुनामावली दुरुस्ती करण्याचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहे. ही बिंदुनामावली नोव्हेंबर २०१८ च्या आधारे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे एसईबीसी आरक्षणाचा लाभ नोव्हेंबर २०१८ पासून मिळणार आहे. विशेष म्हणजे शासनाने १६ टक्के मराठा आरक्षण याच तारखेपासून लागू करीत बिंदुनामावली तयार करण्याचे आदेश दिले होते. 

आर्थिक मागास घटकासाठी केंद्र सरकारने १० टक्के आरक्षण दिले. त्याचाही अंतर्भाव करण्यात आला. हे आरक्षण लक्षात घेता विविध विभागांकडून पदभरतीसाठी जाहिराती काढण्यात आल्या. बेरोजगार युवकांनी याकरता अर्जही  केला. तसेच आवश्‍यक पैसे (डी. डी.) दिले. स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांपर्यंतचा खर्च येतो. काही पदांसाठी परीक्षाही घेण्यात आली. 

आता १३ टक्‍केनुसार सुधारित बिंदुनामावली तयार होणार आहे. मराठा समाजाच्या जागा ३ टक्‍क्‍यांनी कमी होतील. जुन्या जाहिराती रद्द होणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे यावर बेरोजगार युवकांनी केलेला खर्च  वाया जाणार असल्याचे चर्चा आहे. नवीन जाहिरातीसाठी नव्याने अर्ज करून आवश्‍यक पैसेही द्यावे लागतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News