बुलडाण्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस ; अमरावती विभागात 74.2 मि.मी. नोंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019
  • गेल्या अनेक दिवसापासून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता.
  • सद्यस्थितीत विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक 97.4 मि.मी पावसाची नोंद झाली असून, अमरावती विभागात 74.2 मि. मी. पाऊस झाला आहे. 

अकोला - गेल्या अनेक दिवसापासून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. अखेर आर्द्रा नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, यंदा मॉन्सून उशिरा आल्याने जून महिन्यात पावसात मोठी तूट पडली आहे. सद्यस्थितीत विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक 97.4 मि.मी पावसाची नोंद झाली असून, अमरावती विभागात 74.2 मि. मी. पाऊस झाला आहे. 

पावसाळ्याला सुरुवात होऊन तब्बल 20 दिवस उलटूनही पाऊस न आल्याने बळीराजा चिंतीत झाला होता. सर्वसाधारणपणे 23 मे रोजी रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाल्यावर पावसाळ्याला सुरुवात होते. जून महिन्याच्या सुरुवातीला मॉन्सूनचे आगमन होते आणि वरुणराजाची कृपा झाल्यावर बळीराजा शेतीची मशागत करून पेरणीला सुरुवात करीत असतो. परंतु यावर्षी जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटूनही वरुणराजाने पाठ फिरविल्यामुळे बळीराजा कमालीचा चिंतित झाला होता

मागील वर्षी कमी पर्जन्यमान असल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. लोकांना पिण्याकरिता देखील मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकले नव्हते. यावर्षी तरी वरुणराजाची कृपा होऊन यावर्षी जोरदार पावसाची अपेक्षा बळीराजाला होती. परंतु तसे न झाल्याने सर्वत्र निराशेचे वातावरण होते. उशिरा का होईना आर्द्राच्या सरी बरसल्याने बळीराजाच्या हाताला बळ आले आहे. आतापर्यंत नागपूर विभागात 55.0 मि. मी. तर अमरावती विभागात 74.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 
 

पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम 
यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्याने पेरण्या देखील विलंबाने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अनेक भागात अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्‍या पेरण्या खोळंबल्या आहेत.

जिल्हानिहाय पावसाची नोंद 
जिल्हा झालेला पाऊस (मि.मी) 
बुलडाणा 97.4 
अकोला 51.1 
वाशीम 80.3 
अमरावती 65.3 
यवतमाळ 70.2 
नागपूर 48.7 
स्त्रोत पावसाची नोंदणी व विश्लेषणाचे संकेतस्थळ 

नागपूर विभागात तिप्पट तर अमरावती विभागात दुप्पट पावसाची तूट 
यंदा मॉन्सून उशिरा आल्याने जून महिन्यात पावसात मोठी तूट पडली आहे. यावर्षी नागपूर विभागात 55.0 मि. मी. तर अमरावती विभागात 74.2 मि. मी पाऊस झाला. तर गेल्यावर्षी याचवेळेला नागपूर विभागात 156.5 मि. मी. तर अमरावती विभागात 154.9 मि. मी पावसाची नोंद झाली होती. 

अद्यापही टॅंकर सुरूच 
विदर्भातील दुष्काळग्रस्त भागात अद्यापही पाहिचे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 24 जून पर्यंतच्या अहवालानुसार अमरावती विभागात शासकीय व खाजगी अशा 520 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यातील बुलडाणा जिल्हात दमदार पाऊस झाल्याने काही भागातील टॅंकरची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News