वेल्डींग करतांना बॉयलरचा स्फोट; दोन तरुण कामगारांचा मृत्यू, दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा (यिनझब)
Wednesday, 12 June 2019
  • दुर्गा शक्ती ऑईल मिल मध्ये बॉयलरच्या वर वेल्डींग करीत असतांना बॉयलरचा स्फोट
  • दोन तरुण कामगारांचा मृत्यू तर दोन जण जखमी
  •  मंगळवार (ता.11) सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली.

खामगाव: स्थानिक राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 जवळील ऋषीसंकुल जवळ असलेल्या सुरेका यांच्या दुर्गा शक्ती ऑईल मिल मध्ये बॉयलरच्या वर वेल्डींग करीत असतांना बॉयलरचा स्फोट होवून दोन तरुण कामगारांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवार (ता.11) सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली.
      

याबाबत प्राप्त माहितीनुसार, शे.मुशीर शे.हनिफ (30) रा.शौकत कॉलनी,  शे.इसराल शे.अब्रार (28) रा. फाटकपुरा व आणखी दोन कामगार त्याठिकाणी वेल्डींगचे काम करीत होते. बॉयलरमध्ये गॅस जमा झाल्याने अचानक बॉयलरचा स्फोट होवून चार कामगार गंभीररित्या भाजले होते. यातील शे.मुशीर शे.हनिफ (30) रा.शौकत कॉलनी, शे.इसराल शे.अब्रार (28) या दोघांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तर अन्य दोन जखमींना सर्वप्रथम सिल्व्हरसिटी हॉस्पीटल येथे उपचारार्थ भरती करण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर प्रथमोपचार करुन त्यांना सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. या घटनेमुळे सामान्य रुग्णालयात संतप्त नागरीकांचा मोठा जमाव होवून या जमावाने एकच गोंधळ घातला होता. यावेळी दगडफेकही करण्यात आली. तर जमावाला नियंत्रित करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोस्टेचे ठाणेदार संतोष ताले सामान्य रुग्णालयात दाखल झाले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News