रामाळा तलावाची स्वच्छता करणार केवट बोट; पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

साईनाथ सोनटक्के
Thursday, 25 July 2019
  • प्रायोगिक तत्वावर देशातील पहिला प्रयोग; कचरा, गाळ काढण्यासाठी नवीन पद्धतीचा होणार वापर

चंद्रपूर: शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाची स्वच्छता आता मकेवटफ करणार आहे. गाळ आणि कचरा काढणारी ही देशातील पहिली बोट आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सुमारे महिनाभर हा नावीन्यपूर्ण प्रयोग रामाळा तलावात प्रायोगिक तत्वावर राबविला जाणार आहे.

शहराच्या मध्यभागी रामाळा तलाव आहे. जलसंवर्धन आणि सौंदर्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण असलेल्या या तलावाचे महानगरपालिकेच्या वतीने सौंदर्यकरण करण्यात आले. त्यामुळे सकाळ-सायंकाळी अनेकजण विरंगुळा म्हणून येथे येत असतात. मात्र, मागील काही दिवसांत तलावातील पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोबतच कचरा आणि गाळ साचल्यामुळे तलावाचे सपाटीकरण झाले आहे. प्रशासनाने स्थानिक मच्छिमार संघटनांच्या मदतीने तलावाची अनेकदा स्वच्छता केली होती. मात्र, दोन-तीन महिन्यानंतर पुन्हा मजैसे थेफ निर्माण होत होती. तलाव स्वच्छतेच्या किचकट आणि खर्चिक प्रक्रियेमुळे प्रशासन अडचणीत सापडले होते.

मुंबईच्या ओएमआयएम क्लिनटेक कंपनीने तलावातील गाळ आणि कचरा काढणारी देशातील पहिली बोट तयार केली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शहातील रामाळा तलावाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. संबंधित कंपनीशी चर्चा करून चंद्रपुरात बोट आणण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर, संबंधीत कंपनीने तलावाची स्वच्छता करण्यास होकार दिला आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्थेच्या पुढाकारातून एक महिना प्रायोगिक तत्वावर बोटीद्वारे स्वच्छता केली जाणार आहे. या नवीन पद्धतीमुळे तलावाच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. 

बोटीची वैशिष्ट्ये...
मुंबईच्या ओएमआयएम क्लिनटेक कंपनीने केवट बोट तयार केली आहे. तिचा आकार २५ बाय २० फुट आहे. बोटीच्या निर्मितीसाठी सुमारे दीड कोटीचा खर्च करण्यात आला आहे. ७५ एचपीची तीव्रता असून, महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसायटीने (एमएसआयएनएस) बोटीला पुरस्कार दिला आहे. ही बोट तलावातील गाळ आणि फसलेला कचरा साफ करते. अनेक वर्षांपासून असलेला बॅकटेरिया नष्ट करते. तसेच तलावाच्या पाण्यावरील कचरा काढून घेत पाण्यात ऑक्सीजन सोडते. त्यामुळे संपूर्ण पाणी पिण्यायोग्य होते, अशी माहिती कंपनीचे संचालक दिलीप भानुशाली यांनी मसकाळफशी बोलताना दिली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते आज प्रारंभ
रामाळा तलाव शुद्धीकरण पथदर्शी प्रकल्पाचा प्रारंभ गुरुवारी (ता. २५) रामाळा तलाव येथे दुपारी २.३० वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मनपा आयुक्त संजय काकडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई यांनी केले आहे.

"रामाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी बोट वापरली जाणार आहे. हा नावीन्यपूर्ण प्रयोग जिल्ह्यात पहिल्यांदा राबविला जात आहे. शहरवासींनी तलावात कचरा टाकू नये. तलावाचे सौंदर्यीकरण, संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. येणाऱ्या गणेशोत्सव काळात मनपाच्या कुंडातच गणपतींचे विसर्जन करावे."
- डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

"तलावातील पाणी दुषित होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे त्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. तलावातील दुषित पाणी शुद्ध करण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर केला जात आहे. पाण्याचे शुद्धीकरणासोबतच आता कचरा आणि गाळ साफ केला जाणार असल्याने तलावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे."
- संजय काकडे, आयुक्त, महापालिका, चंद्रपूर

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News