खड्यांच्या बाबतीत पालिकेने मुंबईला फसविले ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019
  • आकडेवारी फसवी
  • अनेक रस्ते दुर्लक्षित
  • मुंबईकर त्रस्त

मुंबई : महापालिकेचे मोबाईल ॲप्लिकेशन आणि ट्विटरवर आलेल्या तक्रारीनुसार महापालिका मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे मोजत आहे. प्रत्यक्षात रस्त्यावर जाऊन खड्ड्यांची पाहणी आवश्‍यक असताना टेबलावरच ही आकडेवारी ठरवली जात असल्याचे दिसते. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्ते खड्डेमय झालेले असतानाही पालिका दप्तरी त्यांची नोंद नसल्याने नागरिकांचा खड्डेप्रवास सुरूच आहे.

आतापर्यंत १०७० खड्ड्यांबाबत तक्रारी आल्या असून त्यापैकी ९३४ खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केला आहे; मात्र खुद्द महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी प्रशासनाच्या या आकड्यांवर संशय व्यक्त केला आहे.

महापालिकेने पूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विभाग पातळीवर अभियंत्यांची नियुक्ती केली होती. हे अभियंते रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवून घेत होते; मात्र आता ही यंत्रणा ‘टेबला’पुरती मर्यादीत राहिल्याचा आरोप होऊ लागला आहे. सध्या ट्विटर आणि पालिकेच्या ‘एमसीजीएम २४ बाय ७’ या मोबाईल ॲप्लिकेशनसह नगरसेवकांकडून आलेल्या तक्रारीनुसार खड्डे बुजवले जात आहेत.

पालिकेचे अभियंते स्वत:हून रस्त्यांची तपासणी करत नसून खड्ड्यांचा खरा आकडा लपवला जात आहे, असा आरोप केला जात आहे. दरम्यान, हे खड्डे बुजवताना कोणतीही शास्त्रीय पद्धत वापरली जात नाही. महापालिकेच्या देखभाल विभागाचे कामगार खड्डे दुरुस्ती करत आहेत. ते खड्ड्यांत कोल्डमिक्‍सचे मिश्रण टाकून लोखंडी चकतीने बसवतात. मुंबईच्या रस्त्यांवर कोल्डमिक्‍स टिकणे अवघड आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्‍सचा वापरा करावा, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. 

पावसामुळे काँक्रीटचे रस्तेही खराब झाले आहेत. या रस्त्यांवर २३५ ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्या बुजवण्यासाठी पालिका २५ कोटी ४५ लाख रुपये पालिका खर्च करणार आहे. 

 

"पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ते खड्डे बुजवण्याचे काम विभागपातळीवर सुरू आहे. पालिका प्रशासन देत असलेली खड्ड्यांची आकडेवारी चुकीची आहे. तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत."

- विश्‍वनाथ महाडेश्‍वर, महापौर

एक खड्डा १२०० रुपयांचा 
एक चौरस मीटरचा खड्डा बुजवण्यासाठी पालिका १२०० रुपये खर्च करते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महापालिकेने आतापर्यंत खड्ड्यांवर ११ लाख २० हजार रुपये खर्च केले आहेत.

असा मोजला जातो खड्डा... 
पालिकेने खड्ड्याचे काही निकष ठरवले आहेत. किमान १५ से.मी.पेक्षा खोल आणि एक चौ.मी. रुंद असेल तरच तो खड्डा असल्याचे मानले जाते. तक्रारी आल्यास या निकषांद्वारे शहानिशा करून खड्डे बुजवले जातात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News