प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

बहुचर्चित स्वप्नील भुते खून प्रकरणात पारध पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी  सकाळी एकाला औरंगाबादेतून, तर दुसऱ्याला बुलडाणा येथून ताब्यात घेतले.

पारध - बहुचर्चित स्वप्नील भुते खून प्रकरणात पारध पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी  सकाळी एकाला औरंगाबादेतून, तर दुसऱ्याला बुलडाणा येथून ताब्यात घेतले. प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एकाने साथीदाराच्या मदतीने स्वप्नील याचा काटा काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. कुमार अनुप सोनोने आणि करण शेळके अशी संशयित युवकांची नावे आहेत. 

मासरूळ (जि. बुलडाणा) येथील स्वप्नील भुते (वय २०) या युवकाचा पारध परिसरात शुक्रवारी (ता.१४) खून झाला होता. पारध पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील भुते याच्या नात्यातील मुलीसोबत कुमार सोनवणे याचे प्रेमप्रकरण होते. याची कुणकुण स्वप्नीलला लागली होती. यामुळे काही दिवसांपूर्वी त्याने कुमार याला समजावून सांगितले; मात्र त्याने काणाडोळा करीत मुलीचा पिच्छा सोडत नव्हता. यामुळे स्वप्नील याने मुलीची समजूत घातली. अशा प्रेमप्रकरणामुळे आपली समाजात बदनामी होईल, असे तिला सांगितले.

त्यानंतर संबंधित मुलीने ही माहिती आपला प्रियकर कुमार याच्या कानावर घातली. स्वप्नील प्रेमात अडथळा ठरत असल्याने संतप्त झालेल्या कुमार सोनोने याने मित्र करण शेळके याला सोबत घेऊन शुक्रवारी (ता. १४) दुपारी मासरूळ (जि. बुलडाणा) गाठले. स्वप्नील भुते याला ‘तुझ्या नात्यातील मुलीचा मी नाद सोडला’, असे खोटे सांगून चल फिरायला जाऊ, असे म्हणत दुचाकीवरून त्याला पारध परिसरात आणले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतकरी श्रीरंग सुरडकर यांच्या शेतात त्याला आणले.

तेथे दोन्ही संशयितांनी मद्यपान केले. दारूची झिंग चढल्याने दोघांनी प्रेमप्रकरणावरून स्वप्नीलशी वाद घालण्यास सुरवात केली. त्यातच त्याला काठीने बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्‍यात मोठा दगड टाकून स्वप्नीलला ठार केले. त्याचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून दगडानेही ठेचला. स्वप्नीलच्या खिशातील मोबाईल फोनवरून त्याची ओळख पोलिसांनी पटविली होती. खून प्रकरणानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली; मात्र संशयित सापडत नव्हते. त्यामुळे तपासकामासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह उपविभागीय पोलिस अधिकारी, पारध पोलिसांचे पथक स्थापन करण्यात आले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News