कुठे जन्म घ्यायचा हे माझ्या हातात असतं तर अमेरिकेची निवड केली असती

डॉ. विनय काटे, आयआयएम अहमदाबाद
Thursday, 4 July 2019

जर कुठल्या देशात जन्म घ्यायचा हे माझ्या हातात असतं तर मी निश्चितच अमेरिकेची निवड केली असती. अवघ्या तीनशे वर्षात इतकी स्थित्यंतरे क्वचितच कुठल्या देशाने पाहिली असतील.

जर कुठल्या देशात जन्म घ्यायचा हे माझ्या हातात असतं तर मी निश्चितच अमेरिकेची निवड केली असती. अवघ्या तीनशे वर्षात इतकी स्थित्यंतरे क्वचितच कुठल्या देशाने पाहिली असतील. ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र होण्यासाठीचा "स्वातंत्र्याचा जाहीरनामा", काळ्या लोकांना गुलाम बनवण्याचा हक्क शाबूत राहावा म्हणून झालेले "सिव्हिल वॉर" ज्यात 8 लाखापेक्षा जास्त लोक मेले, त्यानंतर अब्राहम लिंकनने जाहीर केलेले "Proclamation of Emancipation", त्यानंतरची दोन जागतिक महायुद्धे आणि लिंकनने दिलेल्या स्वातंत्र्याला खऱ्याखुऱ्या समानतेत बदलण्यासाठी शंभर वर्षांनी झालेली "सिव्हिल राईट्स मूव्हमेंट" ... अशा अनेक टप्प्यावर अमेरीका स्वतःला बदलत गेली.

फेमिनिझम पासून रॉक बँडच्या विद्रोही गाण्यांपर्यंत, रशियासोबतच्या Cold War आणि Space Race पासून ह्यू हेफनरच्या प्लेबॉयपर्यंत अमेरिका सगळ्या पातळीवर आतमध्ये आणि बाहेर झगडत होती. व्हिएतनामचे युद्ध, वॉटरगेटच्या काळात तेथील मीडियाने स्वतःची धमक दाखवून दिली. ओबामासारखा मिश्रवर्णीय राष्ट्रपती दोन वेळा निवडून दिला. ट्रम्पलाही निवडून दिले आणि त्याचवेळेस तेथील मीडियाने, जनतेने ट्रम्पची यथेच्छ खिल्लीही उडवली आणि विरोधही केला.

लिंकनच्या शांत भाषणापासून, मार्टिन ल्युथर किंगच्या "I have a dream" पासून ते ट्रम्पच्या "Grab them by pussy" पर्यंत सगळ्या गोष्टींना अमेरिकेने स्वीकारले आणि नाकारलेही. स्वतःच्या झेंड्याची बिकिनी करून घातली तरी अमेरिकेत कुणाच्या भावना दुखावत नाहीत की राष्ट्रपतीला कुणी जाहीरपणे मूर्ख म्हणून संबोधले म्हणून "पदाची गरीमा ठेवा" वगैरे ज्ञान तिथे कुणी पाजळले नाही. कुठल्याही धर्मावर टीका केली म्हणून तिथे कुणी फतवा काढायची सोय नाही. सामाजिक भावनिकतेपेक्षा व्यक्तीस्वातंत्र्य या देशाने नेहमी श्रेष्ठ मानले.

अमेरीका आजही रोज स्वतःला बदलत आहे. स्वतःला नव्याने शोधत आहे. स्वतःच्या नोटेवर "In God We Trust" लिहूनही निधर्मी लोकांना हक्क नाकारत नाही. समलैंगिक संबंध असोत की हवामान बदलासाठी होणारी आंदोलने, सगळयात अमेरिका पुढे दिसते. एक देश म्हणून अमेरिकेने प्रचंड चुका केल्या आहेत, भांडवलशाही आणि साम्राज्यवादी शोषणही केले... पण या शोषणाला विरोध करणाऱ्या अमेरिकन लोकांना कुणी देशद्रोही वगैरे म्हणाले नाहीत.

मतमतांतरे खुलेपणाने घेत प्रत्येक अमेरिकन नागरिकाचे आयुष्य आणि त्याच्या स्वातंत्र्यासाठी कुठलीही किंमत द्यायला अमेरिका तयार असते. आमच्यासारखे कितीही लोक मेले आणि कितीही त्रास झाला तरी त्याला देशभक्ती किंवा स्पिरिटच्या नावाखाली झाकायचा मूर्खपणा या देशात कुणी करत नाही.

Happy Independence Day to USA 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News