मी पुन्हा तिच्याकडे पाहीले...ती भिजून चिंब झाली होती..

विवेक चंद्रकांत वैद्य
Friday, 14 June 2019

मी पुन्हा तिच्याकडे पाहीले.ती भिजून चिंब झाली होती. पावसाने मेकअप धुतला गेल्याने तिचा गोरवर्ण अजूनच उजळला होता. तिचे काही केस चेहर्यावर चिटकले होते. पाण्याचे थेंब त्या केसांवरुन हळुवार उतरून तिच्या गालाच्या खळीत दोन क्षण विसावून मग खाली उतरत होते.

दोघही रस्त्याने निघालो होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला. जून महीना असला तरी पावसाचे लक्षण नसल्याने मी रेनकोट छत्री काहीच आणल नव्हतं. तिने मात्र भराभर पर्समधून छोटीशी छत्री काढली व उघडली. एव्हाना पावसाने जोर धरला होता. तिने मला तिच्या छत्रीत बोलावले.खरेतर एवढ्या छोट्या छत्रीत आम्ही दोघे मावणे अशक्य होते. म्हणून मी नाही म्हणालो.पण ती पुन्हा पुन्हा आग्रह करत राहीली आणि माझा नाईलाज झाला.

आम्ही दोघेही छत्रीत आल्यामुळे एकच झाले.अगोदर मी एकटाच भिजत होतो आता दोघेही भिजू लागलो.पण छत्रीच सुखही फारसे मिळाले नाही.जोराचा वारा आला आणि छत्री उल्टी झाली.मी वारा व पाऊस यांच्या विरोधाला न जुमानता पुन्हा छत्री सुलट केली आणि आम्ही चालू लागलो.पण वार्यालाही जोर चढला.तो पुन्हा मागच्यापेक्षाही जोराने आला आणि छत्री उलटवून गेला.आता छत्रीचे दोनतीन तारही तुटले. पाऊसाने ताल धरला होता. मी तिच्याकडे पाहीले. ती पावसाच्या मार्यापासून स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होती.अखेर एका बंद दुकानाच्या ओट्यावर आम्ही आश्रय घेतला.आणखीनही काही लोक तिथे होते.

मी पुन्हा तिच्याकडे पाहीले.ती भिजून चिंब झाली होती. पावसाने मेकअप धुतला गेल्याने तिचा गोरवर्ण अजूनच उजळला होता. तिचे काही केस चेहर्यावर चिटकले होते. पाण्याचे थेंब त्या केसांवरुन हळुवार उतरून तिच्या गालाच्या खळीत दोन क्षण विसावून मग खाली उतरत होते. तिचे लालचुटूक ओठ आणि हनूवटी थंडीमुळे थरथर कापत होती. अधूनमधून तिच्या जवळच्या लेडीज रुमालाने ती चेहरा पुसायचा प्रयत्न करत होती.

प्रयत्न याच्यासाठी की तो रुमाल अगोदरच पुर्णपणे ओला झाला होता. मी तिच्याकडे बघतो आहे हे समजताच ती कसंनूसं हासली.मी माझ्याकडे असलेला रूमाल तिच्यापुढे धरला.पण तो तिने घेतला नाही. तिची धारदार नासीकेच टोक आता लाल होउ लागल होतं. एखाद्या जुन्या कृष्णधवल चित्रपटातील नायीकेसारखी ती सोज्वळ आणि सुंदर दिसत होती. तिची थंडी कमी व्हावी म्हणून तीच्या अगदी जवळ उभे राहावे असे वाटत होते पण तिथे अजूनही काही लोक उभे होते. रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते. रिक्षा मिळण्याची शक्यता नव्हती.

मी पुन्हा तिच्याकडे पाहीले. एखाद्या सुंदर डौलदार फुलाप्रमाणे तिचा चेहरा दिसत होता.शेवटी मला मनावर ताबा ठेवणे अशक्य झाले.हळूच तिचा हात हातात घेऊन थोडेसे तिच्याबाजूला सरकून मी तीच्या कानात म्हणालो "राणी...आय लव्ह यू".
आश्चर्याने तिचे मोठे डोळे अधीकचं मोठे झाले.दोन क्षण माझ्याकडे अविश्वासाने पहात तिने तिचा हात माझ्या हातातून सोडवला आणि म्हणाली "वेडा आहेस का राजा तू? आपल्या लग्नाला पुढच्या महीन्यात दोन वर्ष पुर्ण होतील" 

"अग पण" मी पुढे काही बोलणार तितक्यात तिने ओठावर बोट ठेऊन चूप बसण्याचा इशारा केला.मग मीही एखाद्या आज्ञाधारक नवर्याप्रमाणे तिच्या शेजारी मुकाटयाने उभा राहीलो.दोनच मिनीटांनी तिने माझा दंड पकडला त्यावर डोके टेकवलंआणि म्हणाली "माझं पिल्लू केव्हा शहाणे होणार कुणास ठाऊक ?"

मीही तिच्याकडे वळून म्हणालो "आपल्याला पिल्लू होईल तेव्हा". "चूप रे" ओरडून तिने कृतक् कोपाने माझ्याकडे बघीतले आणि दुसऱ्याच क्षणी लाजून मान खाली वळवली.माझ्या दंडावर तिच्या हाताची पकड अजूनचं घट्ट झाली. आम्ही दोघेही पाऊस थांबण्याची अधीरतेने वाट पहात होतो आणि पाऊस आता अक्षरशः वेड्यासारखा कोसळत होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News