भाजपचे ‘जय श्रीराम’तर ‘तृणमूल’चे जय बंगाल : वाद पेटला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • कोलकत्यात झळकणार ‘जय बंगाल’चे फलक
  • २८८ चौरस फुटांचे १०० भव्य फलक लवकरच शहरात झळकणार​

कोलकता - भाजपकडून होणारा ‘जय श्रीराम’चा नारा आणि तृणमूल काँग्रेसला मारण्यात येणाऱ्या टोमण्यांना उत्तर देण्यासाठी कोलकता महानगरपालिका ‘जय हिंद, जय बंगाल’च्या घोषणांचे फलक लवकरच शहरभर उभारणार आहे.

‘बंगाल आमचा अभिमान आहे,’ अशी घोषणाही या फलकांवर असेल. तसेच विवेकानंद, ईश्‍वरचंद्र विद्यासागर, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, कवी नझरूल इस्लाम आणि भारतातील अनेक दिग्गज व्यक्तींच्या छायाचित्रांचे कोलाज यावर असेल. २८८ चौरस फुटांचे १०० भव्य फलक लवकरच शहरात झळकणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या ‘जय श्रीराम’ मोहिमेला टक्कर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसने ‘वंग जननी’, ‘जय हिंद वाहिनी’ अशा नावांनी विशेष पथके स्थापन केली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्‍चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारात भाजपच्या समर्थकांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केल्याचा दावा केला जात आहे. अशा कार्यकर्त्यांच्या कुटुबांना भेटण्यासाठी ममता बॅनर्जी या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात जात असताना त्यांच्या ताफ्याकडे पाहून भाजप समर्थकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या होत्या. यावरून मोठा वाद निर्माण झाला असून, स्थानिक प्रशासनासमोर अवघड स्थिती निर्माण झाली होती. 

‘तृणमूल’चे काही खासदार, आमदार व नेत्यांबद्दल मोबाईल फोनवरून अपमानकारक विधाने करण्यात आल्याचा आरोप प्रशासकीय बैठकीत करण्यात आला आहे. अशा पद्धतीने अपमान करून त्रास देणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाई करण्याची मागणीही काही नेत्यांनी केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News