भाजपकडून बंगालचा, गुजरात करण्याचा प्रयत्न : तुरुंगात जाईन पण तसे होऊ देणार नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • ममता बॅनर्जींच्या हस्ते विद्यासागर यांच्या पुतळ्याचे अनावरण
  • त्यांनी विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड केल्याचे आम्हाला माहीत आहे​

कोलकता : ‘‘भाजप बंगालचा गुजरात करू पाहत आहे. मी  तुरुंगात जाण्यास तयार आहे; पण हे कदापि होऊ देणार नाही,’’ असा इशारा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दिला. 

राज्यातील १९ व्या शतकातील समाजसुधारक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केले. त्या वेळी त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकत्यामधील ‘रोड शो’दरम्यान झालेल्या हिंसाचारात ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली होती.

या पुतळ्याच्या जागी आता मूळच्या सफेद रंगातील फायबर ग्लासचा नवीन पुतळा उभारण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांनी हरे शाळेमध्ये याचे अनावरण केले. नंतर पुतळा खुल्या वाहनातून महाविद्यालयात हलविण्यात आला व पूर्वीच्याच ठिकाणी तो स्थापन करण्यात आला.

या वेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, राज्यात निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात एकूण दहा जणांचा बळी गेला. यातील आठ जण तृणमूल काँग्रेसचे आहेत, तर दोन कार्यकर्ते भाजपचे आहेत. कोणाचाही मृत्यू हा दुर्दैवीच असतो. मृत्यू पावलेल्या सर्व दहा कार्यकर्त्यांच्या नातेवाइकांना  मदत देण्यात येईल.

अमित शहा यांच्यावर टीका करताना बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘आमच्याकडील दस्तावेजांमध्ये सर्व काही आहे. त्यांनी विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड केल्याचे आम्हाला माहीत आहे. तृणमूलने ३४ वर्षांनंतर पश्‍चिम बंगालमधील निवडणुकीत विजय मिळविला; पण आम्ही लेनिन, मार्क्‍स यांचे पुतळे फोडले नाहीत.’’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News